उद्यम बँकेतर्फे माफक व्याज दर व सुलभ अटींवर 150 रिक्षाचालकांना रोजगार उपलब्ध करून देणार
8 रिक्षाचालकांना ऐन दिवाळीत रिक्षांचा स्वयंरोजगार
पुणे- उद्यम विकास सहकारी बँकेतर्फे लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर 8 सामान्य रिक्षाचालकांना आकर्षक व्याजदराने रिक्षा उपलब्ध करून दिल्या व त्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने आनंदाची होण्यास हातभार लावला. बँकेच्या बिबवेवाडी शाखेत बँकेचे अध्यक्ष पांडुरंग कुलकर्णी,संचालक संदीप खर्डेकर , मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक देशपांडे,शाखा व्यवस्थापक पूजा कुलकर्णी ,श्री सेवा सर्विसेस चे फहीम अरब यांच्या उपस्थितीत रिक्षा व मिठाई देण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना पी के कुलकर्णी म्हणाले ” अवघ्या 13% व्याजदराने व केवळ एक जमीनदार घेऊन बँकेने हे कर्ज उपलब्ध करून दिले आहे. सुमारे 150 रिक्षाचालकांना स्वतःच्या मालकीच्या रिक्षा उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे ही ते म्हणाले.सादर कर्ज योजना आखताना आम्ही सामान्य रिक्षाचालकाला केंद्रबिंदू मानले आणि दिवाळीत “आहे रे” वर्गाकडून “नाही रे” वर्गाला कसे देता येईल यावर लक्ष केंद्रित केले, असे बँकेचे संचालक संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले.तसेच या रिक्षा सी एन जी वर असल्यामुळे त्या प्रदूषणविरहित असणार असून त्यामुळे शहरातील पर्यावरण रक्षणाला ही हातभार लागणार आहे असे ही ते म्हणाले.आम्हाला उद्यम बँकेमुळे ऐन दिवाळीत आमचे रिक्षा मालकीचे स्वप्न साकारले अशी भावना रिक्षाचालकांनी व्यक्त केली.यावेळी विजय वैराट,फिरोज मुजावर,संजय ढगे,सिराज लांडगे ,श्रीमती अनुराधा गाजरे ,श्रीमती लता यादव,विलास कुसेकर व गणपत वाघोले यांना रिक्षाच्या चाव्या देण्यात आल्या.