पुणे, दि. 31 मे : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आज पुणे महापालिकेने शहरातील दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. याचे पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ व पुणे शहर भाजपा व्यापारी आघाडीने स्वागत केले आहे. आणि याबद्दल महापौर मुरलीधर मोहोळ व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
कोरोनाचा फैलाव आणि कोरोना रुग्ण कमी झाल्याने पुणे महापालिकेने शहरातील व्यवहार दुपारी 2 पर्यंत सुरु ठेवण्याचा अत्यंत चांगला निर्णय घेतला. या अनलॉक मुळे मिशन बिगीन अगेन होत असून यासाठी पालकमंत्री अजित पवार, महापौर मुरलीधर मोहोळ, आयुक्त विक्रम कुमार यांचे व्यापाऱ्यांच्या वतीने आभार मानतो. आम्ही नुकतेच या सर्वांना निवेदन देऊन व्यापाऱ्यांची परिस्थिती त्यांच्या निदर्शानास आणून दिली होती. या निर्णयामुळे अर्थकारणाला बळकटी मिळेल. व्यापाऱ्यांनी सर्व नियमांचे पालन करून व्यवहार करावेत.
– सचिन निवंगुणे (अध्यक्ष, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ)
पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भावाची गती कमी झाल्याने अनलॉक करुन मिशन बिगीन अगेन करण्याचा पुणे महापालिकेचा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. पुणे शहर भाजपा व्यापारी आघाडीने महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासणे व आयुक्त विक्रम कुमार यांनी नुकतीच भेट घेऊन व्यापाऱ्यांनी परिस्थिती त्यांच्या निदर्शानास आणून दिली होती. कोरोना आल्यापासून गेल्या सव्वा वर्षांत व्यापाऱ्यांची स्थिती दिवसेंदिवस खालावली आहे. अर्थकारणाला बळकटी द्यायची असेल तर, लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याची अत्यंत आवश्यकता होती. उद्या 1 जूनपासून सर्व व्यापार व व्यवहार दुपारी 2 पर्यंत सुरु ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. याचे आम्ही स्वागत करतो. आणि सर्व नियमांचे पालन करून व्यवहार सुरु ठेवण्याची विनंती व्यापाऱ्यांना करतो.