पुणे-महापालिकेच्या प्रस्तावित भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची इमारत महापालिका स्वखर्चाने उभारणार असून त्यासाठी १४२ कोटींच्या खर्चालाही मान्यता देण्यात आली आहे. आता रुग्णालय उभारणीच्या कामांसाठीची निविदा काढण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. इमारतीच्या बांधकामासाठी एकूण ६५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.वैद्यकीय महाविद्यालय चालविण्यासाठी दरवर्षी सुमारे २०० कोटी रुपये खर्च येणार आहे. त्याची संपूर्ण जबाबदारी महापालिका घेऊ शकत नाही. त्यामुळे हे महाविद्यालय प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावर चालविण्यात यावे, असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र त्यावरून वाद झाल्यानंतर महापालिकेकडूनच इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी ऑगस्ट महिन्यात १४२ कोटींच्या खर्चाला मान्यता दिली होती. त्यासंदर्भातील निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.डाॅ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या आवारात महाविद्यालयाची इमारती उभारण्यात येणार आहे. त्यासाठी डाॅ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाचे बाणेर येथे तात्पुरते स्थलांतर केले जाणार आहे. रुग्णालयाची इमारत महापालिका उभारणार असली तरी वसतिगृह पीपीपी तत्त्वावर उभारण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.