पुणे जिल्हा न्यायालयाची सुरक्षा ‘रामभरोसे’!

Date:

७० टक्के सीसीटीव्ही कॅमेरे बंद; मेटल डिटेक्टर धूळखात, सीमाभिंतीचे काम रखडले; दोनदा बॉम्बच्या धमकीचे ई-मेल

पुणे : पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षेच्या कारणास्तव बसविण्यात आलेले मेटल डिटेक्टर बंद अवस्थेत बाजूला काढून ठेवण्यात आले असून, ते अक्षरशः धूळखात पडले आहेत. त्यातच न्यायालयातील सुमारे ७० टक्के सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मेट्रोच्या कामासाठी पाडण्यात आलेल्या रेल्वे रुळालगतच्या सीमाभिंतीचे पुनर्बांधकामही अद्याप झालेले नाही. अतिक्रमणे, बेशिस्त पार्किंग आणि अपुरा पोलिस बंदोबस्त यामुळे न्यायालयाची सुरक्षा व्यवस्था नेमकी कोणाच्या भरवशावर आहे, असा संतप्त सवाल वकील वर्गातून उपस्थित केला जात आहे.

पुणे जिल्हा न्यायालयाच्या आवारात दररोज हजारो पक्षकार, वकील, न्यायालयीन कर्मचारी आणि नागरिकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे न्यायालयाच्या प्रवेशद्वारापासून संपूर्ण परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था असणे अपेक्षित आहे. मात्र, प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरच बंद असल्याने न्यायालयात येणाऱ्या व्यक्तींची तपासणी प्रभावीपणे होत नसल्याची तक्रार वकिलांकडून करण्यात येत आहे. सुरक्षेसाठी उपलब्ध असलेली महत्त्वाची उपकरणेच वापराविना पडून असल्याने त्यांच्या उपयोगितेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सीमाभिंतीचे काम रखडले; अनधिकृत प्रवेशाचा धोका

मेट्रोच्या कामासाठी रेल्वे रुळांच्या बाजूला असलेली न्यायालयाची सीमाभिंत पाडण्यात आली होती. मात्र, संबंधित कामानंतरही या ठिकाणी सीमाभिंतीचे पुनर्बांधकाम करण्यात आलेले नाही. त्यामुळे न्यायालयाच्या परिसरात अनधिकृत प्रवेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. न्यायालयासारख्या संवेदनशील ठिकाणी सीमाभिंतीची दुरुस्ती रखडणे ही गंभीर बाब मानली जात आहे.

सुमारे ७० टक्के सीसीटीव्ही कॅमेरे बंद!

न्यायालय परिसरातील सुरक्षेचा महत्त्वाचा आधार असलेली सीसीटीव्ही यंत्रणाही अपुऱ्या अवस्थेत आहे. उपलब्ध माहितीनुसार, न्यायालयातील एकूण सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी सुमारे ७० टक्के कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या संवेदनशील भागांतील हालचालींवर लक्ष ठेवणे आणि एखादी अनुचित घटना घडल्यास तिचा मागोवा घेणे कठीण होण्याची शक्यता आहे.

आरोपींच्या नातेवाइकांसह मित्रमंडळींची गर्दी

न्यायालयात दररोज विविध खटल्यांच्या सुनावणीसाठी आरोपींना हजर केले जाते. यावेळी आरोपींना भेटण्यासाठी त्यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येने न्यायालय परिसरात येतात. परिणामी, सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत परिसरात मोठी गर्दी असते. या गर्दीचे योग्य नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी पुरेशी सुरक्षा यंत्रणा असणे आवश्यक आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत गर्दीवर प्रभावी नियंत्रण ठेवले जात नसल्याची वकिलांची तक्रार आहे.

दोनदा बॉम्बच्या धमकीचे ई-मेल

पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारे दोन ई-मेल आतापर्यंत प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. या धमकीनंतर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी दोन वेळा न्यायालयातील वकील, पक्षकार आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांना बाहेर काढून संपूर्ण परिसर रिकामा केला होता. त्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथकाने न्यायालय परिसराची तपासणी केली. मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून न आल्याने न्यायालयीन कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले.

धमकीचे ई-मेल प्राप्त होण्यासारख्या घटना घडल्यानंतरही सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी दूर झालेल्या नसल्याने न्यायालयाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे.

सुरक्षा ऑडिट झाले; अंमलबजावणीचा पाठपुरावा सुरू

याबाबत पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राम भुजबळ म्हणाले, “अपुऱ्या सुरक्षा यंत्रणेमुळे न्यायालय आणि परिसराच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची संख्याही कमी आहे. न्यायालयीन सुरक्षेबाबत सातत्याने बैठका होत असून, त्यामध्ये आम्ही आवश्यक खबरदारीचे उपाय सुचवले आहेत. न्यायालयाचे सुरक्षा ऑडिटदेखील झाले असून, त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत.”

न्यायालयातील सुरक्षेची सद्यस्थिती चिंताजनक

  • प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टर बंद अवस्थेत.
  • सुमारे ७० टक्के सीसीटीव्ही कॅमेरे बंद.
  • मेट्रोच्या कामामुळे पाडलेल्या सीमाभिंतीचे पुनर्बांधकाम रखडले.
  • सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त अपुरा.
  • न्यायालय परिसरातील रस्त्यांवर अतिक्रमणांचे प्रमाण वाढले.
  • बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीसह सुरक्षेचा प्रश्न.
  • आरोपींच्या नातेवाइकांची आणि मित्रमंडळींची मोठी गर्दी.
  • न्यायालयाला दोनदा बॉम्बच्या धमकीचे ई-मेल.

न्यायदानाचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या जिल्हा न्यायालयाच्या सुरक्षेतच अशा त्रुटी राहणे ही गंभीर बाब आहे. धमकीचे ई-मेल, बंद पडलेले सीसीटीव्ही, निकामी मेटल डिटेक्टर आणि उघडी पडलेली सीमाभिंत या सर्व बाबींची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने सुरक्षा व्यवस्था सक्षम करावी, अशी मागणी वकील वर्गातून होत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘जरा याद करो कुर्बानी…’; बालगंधर्व चौकात २६/११ च्या शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली

पोलीस मित्र संघटनेचा उपक्रम; शहीद पोलीस अधिकारी, जवान आणि...

सौर ऊर्जा खरेदीचा करार २५ वर्षांचा, साठवणुकीचा मात्र ४० वर्षांचा! फडणवीस सरकारचे उरफाटे धोरण – मुकुंद किर्दत

कर्जत-भीमाशंकर येथील टोरेंट पॉवरचा प्रकल्प महावितरणसाठी आर्थिकदृष्ट्या तोट्याचा असल्याचा...

यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत महाराष्ट्र घडवला

-काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव मोहन जोशी पुणे : स्व.यशवंतराव चव्हाण...

कोर्टासमोरील मंदार किवळे हल्ला प्रकरणात अवघ्या काही तासांत पाच संशयित ताब्यात!

दोन कथित सूत्रधारांसह तीन संशयित हल्लेखोर पोलिसांच्या जाळ्यात; मंदार...