पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने यंदाचा गणेश जन्म सोहळा माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच आज बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला. मुख्य गणेशजन्म सोहळा दुपारी १२ वाजता होणार आहे. यंदा स्वराभिषेक, गणेशयाग, श्री गणेश जागर असे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
पहाटे ४ ते सकाळी ६ यावेळेत इंडियन आयडॉल फेम नंदिनी व अंगद गायकवाड यांनी श्रीं चरणी स्वराभिषेक अर्पण केलं . स्वराभिषेकातून विविध प्रकारची गीते ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळाली . .
मुख्य गणेशजन्म सोहळ्याला दुपारी १२ वाजता सुरुवात होणार आहे. यामध्ये पारंपरिक वेशात महिला सहभागी होणार आहेत. जन्माच्या वेळी पुष्पवृष्टी देखील करण्यात येणार आहे. यावेळी गणेशाची मंगलआरती होईल. दुपारी ३ ते सायंकाळी ६ यावेळेत सहस्त्रावर्तने होणार आहेत. तर, रात्री १० ते पहाटे ३ वाजेपर्यंत श्री गणेश जागर आयोजित करण्यात आला आहे. मंदिराला फुलांसह आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात येणार आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक रद्द करण्यात आली असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

