गेली जवळजवळ वीस वर्ष गायक, संगीतकार, लेखक, परीक्षक, मधली सुट्टी सारख्या कार्यक्रमाचा संकल्पनाकार अश्या विविध भूमिकांमधून रसिकांना आनंद देणारे डॉ. सलील कुलकर्णी आता लेखक आणि दिग्दर्शक म्हणून ‘वेडिंगचा शिनेमा’ हा चित्रपट घेऊन आपल्यासमोर येत आहेत. हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात १२ एप्रिल २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात प्रमुख भुमिकेमध्ये मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे या आघाडीच्या कलाकारांबरोबर शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार ही नवोदित जोडी झळकणार आहे. डॉ. सलील कुलकर्णी यांनी कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन या सर्वच आघाड्यांवर स्वतःचे नाणे खणखणीतपणे सिद्ध केले आहे, याचीही प्रचिती प्रेक्षकांना हा चित्रपट देईल.
‘पारंपारिक रीतीरिवाजांपासून आधुनिक फॅशन-तऱ्हा आणि पद्धती यांचा मिलाफ आणि त्यातून भरपूर कौटुंबिक मनोरंजन देणारा बहुचर्चित ‘वेडिंगचा शिनेमा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेला टीझर आणि तीन गाणी यांना रसिकांकडून भरपूर प्रतिसाद लाभला आणि चित्रपटाबद्दल खऱ्या अर्थाने हवा निर्माण झाली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये एका लग्नाची तयारी, त्यासाठी केले जाणारे प्री-वेडिंगचे चित्रीकरण, घरातील माणसांची नृत्याची तयारी, चालीरीतींवरील चर्चा या गोष्टी ट्रेलरमधून पुढे येतात. आणि त्याला सिनेरसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे’ अशी माहिती या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन डॉ. सलील कुलकर्णी यांनी पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
वेडिंगचा शिनेमा’ची प्रस्तुती एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटची असून निर्मिती गेरूआ प्रॉडक्शन्स आणि पीइएसबीची आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटने आतापर्यंत अनेक गाजलेले मराठी चित्रपट दिले आहेत. त्यांत मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, मुंबई पुणे मुंबई-२, मुंबई पुणे मुंबई-३. बॉईज-२, बापजन्म, आम्ही दोघी, शिक्षणाच्या आयचा घो, हापूस, आयडियाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरंच काही आणि टाइम प्लीज या चित्रपटांचा समावेश आहे.