पुणे-सिंहगडावर जाणाऱ्या घाटात आज (रविवारी) सायंकाळी चारच्या सुमारास दरड कोसळली. सुदैवाने मोठी हानी टळली.
सुट्टीचा दिवस असल्यामुळे सिंहगडावर आज पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती . त्यात आज सायंकाळी गडावर जाणाऱ्या रस्त्यावर काही ठिकाणी दगड घसरत असल्याचे सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तातडीने गडावर जाणारी व गडावरून येणारी वाहतूक अडवली. त्यामुळे दरड कोसळल्यामुळे होणारी मोठी हानी टळली.
तूर्तास दरड काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून पर्यटकांना गडावरच थांबण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तासाभरातच दरड रस्त्यातून बाजूला करण्यात येईल व रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. दरम्यान, मिळालेल्या वृत्तानुसार जेसीबी यंत्रणा पोहोचली असून दुचाकी गाड्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.