विश्व हिंदू परिषद श्री शिवराज्याभिषेक अभिवादन समिती (किल्ले सिंहगड) तर्फे आयोजन
पुणे : भारतीय इतिहासातील सुवर्णक्षण म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा. शिवराज्याभिषेकाचा हा उत्सव यंदा देखील सिंहगडावर साजरा होणार आहे. विश्व हिंदू परिषद, पुणे श्री शिवराज्याभिषेक अभिवादन समिती (किल्ले सिंहगड) च्या वतीने तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिन व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त किल्ले सिंहगड येथे भव्य अभिवादन सोहळ््याचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ त्रयोदशी, रविवार दिनांक १२ जून रोजी सकाळी १० वाजता सिंहगडावर पालखी सोहळा व मिरवणूक काढण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष किशोर चव्हाण दिली.
अभिवादन सोहळ्याचे यंदा पाचवे वर्ष आहे. सोहळ्याचा प्रारंभ रविवारी सकाळी ८ वाजता छत्रपती राजाराम पूलाजवळील वीर बाजी पासलकर स्मारकपासून आयोजित विराट दुचाकी रॅलीने होणार आहे. विठ्ठलवाडी, हिंगणे, माणिकबाग, धायरी फाटा, किरकटवाडी, खडकवासला, डोणजे, सिंहगड पायथा या मार्गीने सिंहगडावरील वाहनतळ येथे रॅलीचा समारोप होईल. सोहळ्यामध्ये तब्बल २ हजार शिवभक्त सहभागी होणार आहेत.
किशोर चव्हाण म्हणाले, रविवारी सकाळी १० वाजता सिंहगडावरील वाहनतळापासून नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी व कार्यक्रम मैदानापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. पालखी मिरवणुकीत ढोल-ताशा पथक, शंखनाद पथक आदी सहभागी होणार आहेत. यावेळी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज सुरेशदादा मोहिते यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीस अभिषेक होणार आहे. तसेच नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे पूजन देखील करण्यात येणार आहे.
सोहळ्याला विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संयुक्त मंत्री व सहसत्संग प्रमुख दादा वेदक, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष पांडुरंग राऊत, प्रांत मंत्री संजय मुरदाळे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सिंहगडावरील मंदिरे व ऐतिहासिक ठिकाणांचे पूजन देखील यावेळी होणार आहे. तरी सर्व शिवभक्तांनी या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.