गो.नी. दांडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘दुर्गदिन’ साजरा
पुणे : दुर्गमहर्षी गो.नी. दांडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने ‘दुर्गदिन’ साजरा करण्यात आला. यावेळी साहित्यिका वीणा देव, इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे उपस्थित होते. कार्यक्रमात अऋजा माने (वय ५ वर्षे), ज्येष्ठ माने ( वय ८ वर्षे) यांचा ३८ किल्ले सर केल्याबद्दल गौरव करण्यात आला. यावेळी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ निर्मित ‘किल्ले पाहिलेला माणूस: गोपाल नीलकंठ दांडेकर’ ही चित्रफित दाखवण्यात आली.
वीणा देव म्हणाल्या, गोनीदांच्या दृष्टीने गडकोट हे इतिहासाचे जिवंत साक्षीदार आहेत. यावेळी त्यांनी गो.नी. दांडेकरांच्या दुर्गभ्रमंतीच्या आठवणींना उजाळा दिला.
मोहन शेटे म्हणाले, पुढील वर्षी गो.नी. दांडेकर आणि शाहीर किसनराव हिंगे यांची २५ वी पुण्यतिथी आहे म्हणून इतिहास प्रेमी मंडळ आणि शाहीर हिंगे लोककला, प्रबोधिनी या दोन संस्था पुढील वर्षात वंचित मुलांच्या २५ किल्ल्यांवर सहली आयोजित करून या दोन महान व्यक्तींना आगळीवेगळी आदरांजली अर्पण करणार आहेत.