पुणे : सुप्रसिद्ध संवादिनी वादक आणि भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या परफॉर्मिंग आर्ट्स आणि ललित कला विभागाचे संचालक शारंगधर साठे यांना गानवर्धन संस्थेचा कै. पंडित आप्पासाहेब जळगावकर संवादिनी वादक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांना स्वर-लय-रत्न उपाधी देण्यात आली.
एरंडवण्यातील मनोहर मंगल कार्यालय येथे पुरस्कार प्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम, गानवर्धनचे कार्यवाह रवींद्र दुर्वे, कार्याध्यक्ष दयानंद घोटकर उपस्थित होते. शाल, सन्मानपत्र आणि रोख १० हजार असे पुरस्काराचे स्वरूप होते.
मागील ४० वर्षांहून अधिक काळ शारंगधर साठे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात कार्यरत आहेत. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, पंडित शिवकुमार शर्मा, उस्ताद शाहीद परवेझ अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या कौतुकास शारंगधर साठे पात्र ठरलेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कलाकार तयार झाले आहेत.