पुणे- एस.टी बसवर दरोडा टाकून सुमारे कुरियर कंपनीची 65 लाखांची रोकड पळवून नेणा-या अकरा दरोडेखोरांना गजाआड कऱण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.ग्रामीण पोलिस गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक राम जाधव आणि सहायक निरीक्षक व्ही यु घोळवे यांच्या पथकाने हि कामगिरी केली आहे
रूपेश दिनकर गायकवाड (वय- 32, रा. मुळा-मुठा बिल्डिंग, रामटेकडी), सुनील उर्फ कपिल मदन रंदवे (वय- 32, रा. मुळा-मुठा बिल्डिंग, रामटेकडी), ज्ञानेश्वर उर्फ ज्ञानोबा उर्फ माऊली हनुमंत सोनमाळी (वय- 23, रा, सटवाई मंदिराजवळ, मांजरी), शामसिंग रामसिंग परदेशी (वय- 38, रा. केडगाव, शिवाजीनगर, अहमदनगर), भऱत उर्फ भाऊ निवृत्ती कांडेकर (वय- 31, रा. केडगाव, अहमदनगर), राजू उर्फ राजेंद्र मोहन फडतरे (वय- 25, रा. केडगाव, अहमदनगर), सचिन प्रकाश राजगुरू (वय- 24, रा. केडगाव, अहमदनगर), रविंद्र श्रीहरी दिवाण (वय- 22, रा. सटवाईनगर, मांजरी) अश्विन अंबादास गिरवले (वय- 31, रा. काळेपडळ, हडपसर, मुळगाव- देऊळगाव सिद्धी, अहमदनगर), शरद दत्तात्रय यादव (वय- 25) व अमोल बापुसाहेब निकम (वय- 24, दोघेही रा. सटवाईनगर, मांजरी) असे अटक कऱण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी सांगितले कि , रोहिदास चिताळे हे अहमदनगर येथील आधुनीक कुरिअर्स, सोमानी कुरिअर्स व गांधी कुरिअर्स या तीन कुरिअर कंपनीत काम करतात. दहा दिवसांपुर्वी (दि.29 डिसेंबर) ते अहमदनगर येथून कुरिअर कंपनीचे पार्सलची गोणी घेऊन एस.टी.ने अहमदनगर येथून मुंबईला जात होते. त्यांची एस.टी. लोणींकद परिसरात आल्यानंतर स्विफ्ट कार व दोन बुलेट गाडीवरून आलेल्या अकरा दरोडेखोरांनी एस.टी. अडवली. चिताळे व त्यांच्या साथिदाराला एस.टी.च्या खाली उतरवून त्यांच्याजवळ असलेल्या पार्सलमधील सुमारे 64 लाख 93 हजार रुपयांची रोकड या दरोडेखोरांनी पळवून नेली. या प्रकऱणी अनोळखी दरोडेखोरांविरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ग्रामीणपोलीस अधीक्षक डॉ.जय जाधव यांनी पी आय राम जाधव यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपविला होता . या दरोड्याचा तपास करीत असता पोलिसांना खब-यांमार्फत आरोपींची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून अकरा दरोडेखोरांना अटक केली. त्यांच्याकडून दरोड्यातील 64 लाख 93 हजार रुपयांपैकी 53 लाख 70 हजार रूपये जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली एक टाटा इंडिका व्हिस्टा कार व दोन बुलेट मोटारसायकलही जप्त करण्यात आले आहे.