विकासकामे होत नसतील तर, महापालिकेत लक्ष घालणार – खासदार काकडे
पुणे : नगरसेवक हे लोकप्रतिनिधी आहेत. शहरातील नियोजीत व सुरु असलेल्या विकास प्रकल्पांची माहिती त्यांना मिळालीच पाहिजे. शिवाय त्यांच्या प्रभागातील विकासकामे प्राधान्याने मार्गी लावली पाहिजेत. याकामी महापालिका आयुक्त व प्रशासन यांची सहकार्याचीच भूमिका असली पाहिजे. ते होत नसल्याचे नगरसेवकांनी आजच्या बैठकीत सांगितले. त्यामुळे यापुढे शहर विकास व नगरसेवकांच्या प्रश्नांसाठी महापालिकेच्या कारभारात लक्ष घालू. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही नगरसेवकांचे म्हणणे आपण मांडणार आहोत, असे भारतीय जनता पक्षाचे सहयोगी सदस्य व खासदार संजय काकडे यांनी सांगितले.दरम्यान महापालिकेत ठप्प पडलेल्या विकासाच्या योजना आणि काकडे यांनी घेतलेल्या पावित्र्यामुळे पुण्याच्या कारभारात स्थानिक नेतृत्वाचीच उणीव भासत असल्याचे स्पष्ट झाले आहे . निष्ठा ,जातीयवाद आणि लक्ष्मी यांच्या वास्तववादी व्यवहारीक लढाईत स्थानिक नेतृत्वाची रुबाबदार छबी जणू नाहीसी झाल्याने महापालिकेतील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी याचीही पंचाईत होत असल्याचे बोलले जात आहे .
महापालिका आयुक्त व प्रशासन नगरसेवकांची अडवणूक करीत असल्याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. त्याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी खासदार काकडे यांनी आज नगरसेवकांची बैठक बोलाविली होती. त्यास सुमारे 40 नगरसेवकांनी उपस्थिती लावली. खासदार काकडे यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले व यापुढे महापालिकेच्या कामकाजात लक्ष घालून नगरसेवकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच, प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेही हे प्रश्न मांडू व त्यावर तोडगा काढू असा विश्वासही त्यांनी यावेळी नगरसेवकांना दिला.
चोवीस तास पाणी पुरवठ्याच्या योजनेची माहिती देण्यास प्रशासनाने टाळाटाळ केली. पूर्वीची निविदा रद्द केल्यानंतर आता कोणत्या पद्धतीने निविदा काढल्यात व त्यातील अटी व शर्थी काय आहेत? पाण्याचे मीटर व ऑप्टिकल फाइबर डक्ट स्मार्ट सिटीअंतर्गत बसविले जाणार असतानाही महापालिका त्यावर पुणेकरांचे 194 कोटी रुपये का खर्च करीत आहे? यासंदर्भातील माहिती नगरसेवकांनी पालिकेच्या सभेत मागितली. परंतु, ती देणे प्रशासनाने टाळले. पुणेकरांनी विकासासाठी भाजपाला सत्ता दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस व पक्षाचाही विकासाचाच अजेंडा आहे. मात्र, महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्याच नगरसेवकांना विकास कामांची माहिती दिली जात नाही. त्यांच्या प्रभागातील प्रश्न सुटत नसतील तर, महापालिका आयुक्त व प्रशासनाच्या या आडमुठेपणाची दखल घावीच लागेल. शहराच्या विकासाविषयी भाजप आग्रही असेन, असेही खासदार काकडे म्हणाले.