पुणे- बॉलीवूड मधील स्टार कलाकारांची मांदियाळीत संगीत, नृत्य, नाट्य, कला, वादन, गायन, क्रीडा व
संस्कृती यांचा मनोहारी संगम असलेल्या २९ व्या पुणे फेस्टिवलचे शुक्रवारी जेष्ठ दिग्दर्शक सुभाष घई व
जेष्ठ अभिनेते खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्या हस्ते शानदार उद्घाटन झाले. आज जो काही मी आहे, तो
पुण्यामुळेच आहे असे सांगून पुणे फेस्टीवलशी आपले एक वेगळे नाते आहे असे शत्रुघ्न सिन्हा यावेळी
म्हणाले.
२९ व्या पुणे फेस्टिवलचे उद्घाटन श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे झाले त्यावेळी प्रमुख अतिथी
म्हणून खासदार शत्रुघ्न सिन्हा बोलत होते. पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी, पुण्याचे पालकमंत्री
गिरीश बापट, राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंधारण
राज्यमंत्री विजय शिवतरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, महापौर मुक्ता टिळक, जेष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे,
अभिनेते शेखर सुमन, आय. टी. तज्ञ आनंद खांडेकर, पुणे फेस्टिवलचे मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे,
सौ. मीरा कलमाडी, पुणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री रमेश बागवे, सिनेस्टार पूनम धिल्लन, उर्मिला
मातोंडकर, नेहा शर्मा, कार्तिक आर्यन, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटिन एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी. ए.
इनामदार, एस. बँकेचे अधिकारी देवदत्त कुऱ्हाडे, अमित शेख, पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष सुभाष सणस, डॉ.
सतीश देसाई आदी यावेळी उपस्थित होते.
अभिनेते शेखर सुमन, जेष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे आणि आय. टी. तज्ञ आनंद खांडेकर यांना यंदाच्या
पुणे फेस्टिवल अॅवार्डने सन्मानित करण्यात आले. तसेच शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षे साजरे करणाऱ्या
राजाराम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शनिपार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व गणेश पेठ पांगुळ आळी
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा प्रातिनिधिक स्वरूपात यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, पुण्यातील फिल्म इंस्टीट्युटमध्ये मी अभिनयाचे शिक्षण घेतले. त्यावेळपासून
माझा आणि पुण्याचा ऋणानुबंध आहे. पुण्यातील अनेक भागात मी राहिलो आहे. आज जो काही मी आहे
तो पुण्यामुळेच असून पुणे हे माझे ‘पहिले प्रेम’ आहे.
सुभाष घई म्हणाले, पुणे फेस्टिवल हा सर्व फेस्टिवलची मातृ संस्था आहे. माझे पुण्याबरोबर व पुणे
फेस्टिवलशी एक वेगळे नाते आहे.
प्रारंभी प्रास्ताविकपार भाषणात सुरेश कलमाडी म्हणाले, लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव
देशभर पोहचविला. पुणे फेस्टिवलकडून प्रेरणा घेऊन अनेक महोत्सव सुरु झाले ही आनंदाची बाब आहे.
पुणेकर रसिकांनी जो प्रतिसाद दिला त्यामुळे हा फेस्टिवल सलग २९ वर्षे सुरु असून त्याचे सर्व श्रेय रसिक
पुणेकरांना जाते. पुण्याचे नाव उंच राहावे यासाठी आपण कायम प्रयत्न केले असे सांगून कलमाडी
म्हणाले, जगाच्या पर्यटनाच्या नकाशावर पुण्याचे नाव या महोत्सवामुळे कोरले गेले.
जयकुमार रावल म्हणाले, पर्यटकांना पुण्याकडे आकर्षित करण्याची सुरुवात पुणे फेस्टिवलमुळे झाली.
अजूनही ते आकर्षण टिकून आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनेक कार्यक्रम सुरु झाले व बंद झाले मात्र,
पुणे फेस्टिवल अजूनही सुरु असून सांस्कृतिक वारसेला समृध्द करण्याचे काम पुणे फेस्टिवलणे केले आहे.
महापौर मुक्त टिळक म्हणाल्या, गेली २९ वर्षे पुणे फेस्टिवल यशस्वीरित्या सुरु असून लोकमान्य
टिळकांनी सुरु केलेले समाज प्रबोधनाचे कार्य या महोत्सवाच्या माध्यमातून सुरु आहे. अजूनही पुणे
फेस्टिवलचि क्रेझ गेलेली नाही असेही त्यांनी नमूद केले.
सुमित्रा भावे म्हणाल्या, मला राजकारणी माणसांची भीती वाटते. परंतु माझा एक चित्रपट बघितल्यानंतर
सुरेश कलमाडी यांनी तो चित्रपट त्यांना भावल्याचे प्रत्यक्ष भेट घेऊन मला सांगितले. राजकारणी माणसे
केवळ राजकारणी नसतात तर ते सहृदायही असतात याचा प्रत्यय मला त्यावेळी आला. राजकारणापलीकडे
जावून मला त्यांच्यातील माणूसपण बघायला मिळाले. त्यामुळे आजच्या माझ्या सन्मानाने खूप आनंद
होत आहे.
गिरीश बापट, शेखर सुमन यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले
प्रारंभी पुणे फेस्टिवलच्या उद्घाटन सोहळ्याला तुकाराम दैठणकर यांच्या सनई वादनाने प्रारंभ झाला.
त्यानंतर नंदीनी राव गुजर यांनी ईशस्तवन प्रार्थना सदर केली. यानंतर सर्व पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन
करून मंचावरील श्री गणेशाची आरती करण्यात आली. नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांनी कला दिग्दर्शन
केलेली व स्वप्नील रास्ते यांच्या संकल्पनेवर आधारित नेत्रदीपक ‘गणेशवंदना’ सादर केली. या
नृत्याविष्कारात शर्वरी जमेनीस यांच्या समवेत मृण्मयी देशपांडे, नकुल घाणेकर, राधा कुलकर्णी आणि इतर
कलाकार सहभागी झाले होते. त्यानंतर श्री शिवछत्रपतींचे स्फूर्ती गीत व महाराष्ट्राच्या संस्कृतीवरील गीत
यावर सादर होणारा, धनंजय भावलेकर व संग्राम भालकर यांनी नृत्यदिग्दर्शन केलेला ‘महाराष्ट्राच्या देशा –
शिवबाच्या देशा’ हा विशेष कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली. यामध्ये सिनेकलावंत भार्गवी चिरमुले, नंदेश
उमप, अभ्यंग कुवळेकर आणि ३० मावळ्यांच्या संचाने भाग घेतला. यानंतर उद्घाटन सोहळ्याचे विशेष
आकर्षण असणारा कोरीओग्राफर निकिता मोघे आणि सिनेकलावंत उर्मिला मातोंडकर, पूजा सावंत, नेहा
महाजन,तेजस्विनी लोणारी, वैष्णवी पाटील, वैशाली जाधव आणि गिरीजा प्रभू यांच्यासह पुणे फेस्टिवलच्या
३० कलाकारांचा सहभाग असणारा ‘लावणी व टॉलिवूड बॉलिवूड रिमिक्स’ या फ्युजन असलेल्या
कार्यक्रमाने प्रेक्षकांनी रंगमंच डोक्यावर घेतले. त्यानंतर महाराष्ट्र मंडळाच्या १५ विद्यार्थ्यांनी योग आणि
२५ विद्यार्थ्यांनी मल्लखांबाची नेत्रदीपक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थित प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
‘ बॉयीज’ या मराठी चित्रपटाचे प्रमोशन यावेळी करण्यात आले. संगीतकार,गायक अवधूत गुप्ते व इतर
कलाकार यावेळी उपस्थित होते.
उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन मराठीतून निवेदक योगेश देशपांडे यांनी तर इंग्रजीतून निवेदिका दुरिया
शिपचँडलर यांनी केले.
पुढच्या वर्षी पुणे फेस्टिवलला ३० लाख
मागच्या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाकडून ५ लाख देण्यात आले होते. यंदा १० लाख रुपये
दिले आहेत. पुढच्या वर्षी पुणे फेस्टिवल ३० वर्षे पूर्ण करणारा असून महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन
विभागाकडून ३० लाख रुपये देण्यात या फेस्टिवलसाठी ३० लाख रुपये देण्यात येतील अशी घोषणा
राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिले.