पुणे- फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत बुधवारी रात्री खून झाल्याचे उघडकीस आले आहे.गुंड प्रवीण महाजनने फरासखाना पोलीस ठाण्यातील सहाय्यक उपनिरीक्षक समीर सय्यद यांचा खून केला आहे. पोलिसांनी महाजनला बेड्या ठोकल्या आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण महाजन हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. बॉडी ऑफेन्सचे त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या कृत्यामुळे त्याला गेल्या वर्षी शहर व जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार देखील करण्यात आले होते.
मात्र, तडीपार काळात देखील तो शहरात आला. सहाय्यक उपनिरीक्षक समीर सय्यद (वय 48) हे बंदोबस्त आटोपून घरी चालले होते. सय्यद हे खडक पोलीस लाईनमध्ये राहायला होते. सय्यद हे श्रीकृष्ण टॉकीजवळ पोहोचले असता प्रवीण महाजनने त्यांचा खून केला. मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर काही वेळातच पोलीस दलात खळबळ उडाली, माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तेथे धाव घेतली. तर प्रवीण याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याने हा खून का केले हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस घटनास्थळावर दाखल होऊन तपास करत आहेत.