पुणे -महापालिकेचे २०१७-१८ या वर्षीचे अंदाजपत्रक आज, गुरुवारी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी मुख्य सभेला सादर केले. महापौर मुक्ता टिळक या सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. . याआधी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी प्रशासनाच्या वतीने ५ हजार ६०० कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर केले होते. त्यात नव्या योजनांचा समावेश करून ३१२ कोटींची वाढ करण्यात आली असून, एकूण ५ हजार ९१२ कोटींचे अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेपुढे सादर करण्यात आले.
ठळक वैशिष्ट्ये:
– पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना कवच योजनेसाठी १० कोटींची विशेष तरतूद. अपघात विमा ५ लाख रुपयांचा असून त्यामध्ये प्रामणिकपणे कर भरणा होणार आहे. यामधून महापालिकेचे उत्पन्न वाढेल आणि नागरिकांना विमा कवचही मिळणार
– अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठी १५ कोटींची तरतूद. हे महाविद्यालय डॉ. नायडू रुग्णालयात सुरु करणार
– सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजसाठी ५ कोटी, पुण्याच्या पश्चिम भागात महापालिकेचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यासाठी ५ कोटी
– पुणे शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कुंडलिका नदीतून वाया जाणारे पाणी अडवून वरसगाव धरणामध्ये आणले जाणार. यासाठी १ कोटीची तरतूद. यामुळे किमान १ टीएमसी पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत
– प्रायोगिक रंगभूमीसाठी १ कोटी
– पाणी पुरवठा विभागासाठी महसूली तरतूद ३५२ कोटी ३१ लाख, भांडवली कामासाठी ७८८ कोटी ५७ लाख रुपयांची तरतूद.
केंद्र सरकारच्या माध्यमातून नदीसुधार प्रकल्प राबवला जाणार असून, यासाठी ९९० कोटी रुपयांची तरतूद,
महापालिकेकडून १५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
– २४ तास समान पाणी पुरवठा योजनेंतर्गत जलवाहिन्या टाकणे, नवीन पाण्याच्या टाक्या उभारणे या सर्व कामांसाठी ३०२ कोटींची तरतूद
– मिळकत कर विभागासाठी १ हजार ३३३ कोटी ६० लाख रुपयांचे लक्ष्य ठेवले असून सर्व मिळकतीचे जीआयएस मॅपिंगद्वारे सर्वेक्षण. १ हजार ७१८ कोटींची वसुली होण्याचा अंदाज
– बांधकाम परवानगी आणि विकास शुल्क विभागामार्फत १ हजार २५ कोटी रुपयांच्या मिळकतीचे उद्दिष्ट. तसेच समुद्री जैवविविधता केंद्र उभारण्यासाठी १ कोटींची तर, शिवसृष्टी प्रकल्पासाठी १० कोटींची विशेष तरतूद
– गणेशोत्सव शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. त्यामुळे या उत्सवासाठी २ कोटी रुपयांची विशेष तरतूद
– ‘पीएमपीएमएल’ आधिक सक्षम करण्यासाठी १४५ कोटी रुपयांची विशेष तरतूद, १५५० नवीन बस खरेदी करून ३७० मार्गांवर बसची संख्या वाढवण्यावर भर, बससाठी १३ नवीन आगार उभारण्यात येणार आहेत. यासाठी २ कोटींची विशेष तरतूद
– घनकचरा विभागामार्फत शहरातील कचरा संकलनासाठी १५ घंटागाड्या, कचरा वाहून नेण्यासाठी २०० गाड्या भाड्याने घेण्याचे नियोजन
– उरुळी देवाची आणि फुरुसुंगी येथील कचरा डेपोमध्ये ७५० टनाचा प्रकल्प उभारला जाणार आहे. मोशी आणि पिंपरी – सांडस येथील जागा महापालिकेच्या ताब्यात घेण्यासाठी आणि तेथील कामे करण्यासाठी ७८ कोटी ४५ लाख रुपयांची विशेष तरतूद
– मेट्रो प्रकल्पासाठी ५० कोटी, पुणे महापालिकेच्या सर्व शाळा ई – लर्निंग करण्यासाठी ६ कोटी, महापालिकेच्या दोन प्रसूतिगृहामध्ये नवजात अर्भक कक्ष विकसित करण्यासाठी २ कोटी, आदीवासी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे उभारण्यासाठी १ कोटी
– महापालिकेच्या शाळांमधील विशेष नैपुण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लोकमान्य टिळक गुणवत्ता पुरस्कार दिला जाणार असून त्यासाठी ५० लाख रुपयांची विशेष तरतूद
– भिडेवाडा दुरूस्ती आणि स्मारक उभारण्यासाठी १ कोटी
– केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी प्रकल्पातील ५१ प्रकल्पांची कामे मार्गी लावण्यासाठी ५० कोटी