पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (दि.२४) पुणे मेट्रो प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. तत्पूर्वी काल पालकमंत्री गिरीश बापट यांनी कार्यक्रमस्थळी जाऊन कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव आणि पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडून आढावा घेतला.
कार्यक्रमाच्या नियोजनाविषयी सांगताना बापट म्हणाले की, ‘कार्यक्रमाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. सुमारे ४० ते ५० हजार लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील, असा आमचा अंदाज आहे. सुमारे १० हजार वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. उपस्थितांच्या सोयीसाठी ६ स्क्रीन्स मैदानात तर ३ मैदानाबाहेर बसविण्यात येणार आहेत. मुंबई येथील कार्यक्रम पार पाडून सुमारे ६.१५च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुण्यात आगमन होईल. त्यानंतर ६.४०ला कार्यक्रमास सुरुवात होईल. ७.४० पर्यंत हा सोहळा संपन्न होईल. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवरून पाहता येईल’
ते पुढे म्हणाले की, गेली १० वर्षे रखडलेल्या मेट्रो प्रकल्पास भारतीय जनता पक्षाच्या सरकारने खऱ्या अर्थाने गती दिली. त्यामुळेच केवळ २ वर्षात केंद्र व राज्य सरकारची या प्रकल्पास मान्यता प्राप्त झाली. आता मेट्रोचे काम प्रत्यक्षातही सुरु झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या तत्परतेनेमुळेच या प्रकल्पास अल्पावधीत मान्यता प्राप्त झाली, असल्याचेही बापट यांनी आवर्जून सांगितले. यावेळी खासदार संजय काकडे आणि भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावलेही उपस्थित होते.
राजकीय रंग देण्यात रस नाही: बापट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पार पडणाऱ्या भूमिपूजन सोहळ्याचा निषेध नोंदविण्यासाठी काल कॉग्रेस पक्षाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे भूमिपूजन केले. याविषयी बापट यांना विचारले असता ते म्हणाले की, हा शासकीय कार्यक्रम आहे. त्याला राजकीय रंग देण्यात मला रस नाही. सर्वांना या कार्यक्रमाचे निमंत्रण जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आले आहे.