मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या चतुरस्र अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारे दोन गुणी अभिनेते म्हणजे डॉ. गिरीश ओक आणि संजय मोने. मनोरंजनाच्या या विश्वात या दोघांनी विविध भूमिकांमधून अभिनयाची मनसोक्त मुशाफिरी केली आहे. धीरगंभीर चरित्र भूमिका, विनोदी भूमिका, खलभूमिका, बेरक्या ढंगाच्या भूमिका अशा एक ना अनेक भूमिका या दोघांनी आजवर साकारल्या आहेत. या दोघांनी एकत्र काम केलेलं कुसुम मनोहर लेले (कुमले) हे नाटक तर रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलं. या नाटकानंतर या दोन अभिनेत्यांनी एकत्र काम करण्याचा योग तसा जुळून आला नाही. आता अनेक वर्षांनंतर ही जोडगोळी एकत्र दिसणार आहे झी मराठीवरील ‘पसंत आहे मुलगी’ या मालिकेत. कुमलेप्रमाणे यातही गिरीश ओक पंतांच्या सकारात्मक भूमिकेत आहेत तर संजय मोने हे खलभूमिका साकारत आहेत. या दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी या मालिकेतून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
देवसाखरी गावातील आनंद महाराजांच्या मठाचं मानाचं पद पंतांकडे आहे. परंपरेशी तडजोड नाही हा पंतांचा स्वभावधर्म. त्यांच्या शब्दाला गावात मोठा मान आहे त्यामुळे आनंद महाराजांच्या मठाचा आणि देवसाखरीचा संपूर्ण कारभार हा त्यांच्या शब्दावर चालतो. कृष्णकांत कुलकर्णी हे या गावातील राजकीय महत्वाकांक्षा असणारं व्यक्तिमत्व. पंतांना मिळणारा हा मान मराताब कृष्णकांत कुलकर्णीच्या डोळ्यांत खुपतोय म्हणूनच पंताची ही प्रतिष्ठा स्वतःकडे यावी यासाठी तो सतत काही तरी खेळ्या रचतोय पण त्यात मात्र कधीच यशस्वी ठरत नाहीये. पंतांची ही सत्ता स्वतःकडे घेण्यासाठी आता कुलकर्णीच्या डोक्यात पंतांच्या घरात फूट पाडण्याचा कुटील डाव आकार घेतोय. यासाठी तो स्वतःच्याच मुलीला मोहरा बनवून खेळी खेळणार आहे. आपली मुलगी नीता हिचा विवाह पंतांचा धाकटा मुलगा पुनर्वसूशी (वासू) करून देण्याचा त्याचा मानस आहे. नीता या घरात नांदायला गेली की तिच्याआधारे या घरात फूट पाडून ती सत्ता बळकावयाची असा छुपा मनसुबा कुलकर्णीच्या डोक्यात आहे. तिकडे पुनर्वसू मात्र उर्मीच्या प्रेमात आहे. त्याला तिच्याशीच लग्न करायचंय. इकडे कुलकर्णी साळसूदपणाचा आव आणत पंतांकडे नीताच्या लग्नाची गोष्ट बोलून दाखवतो आणि पंतही नीताला आपली सून बनवून घेण्यास तयार होतात. पंत आपला निर्णय वासूला ऐकवतात. पंतांचा शब्द नाकारण्याची हिंमत वासूमध्ये नाहीये त्यामुळे तोही या लग्नासाठी तयार होतो. या दोघांचा विवाह लावून देण्यात आणि आपले मनसुबे खरे करण्यात कुलकर्णी यशस्वी होतो का ? आणि हा विवाह झाला नाही तर त्याची पुढची खेळी काय असेल ? हे प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारं असेल.
कुलकर्णीच्या या बेरक्या भूमिकेतून संजय मोने आपल्या अभिनयाची चौफेर फटकेबाजी करणार आहेत. पंतांची भूमिका यापूर्वीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे आता कुलकर्णींचं हे पात्रही त्यांना आवडेल असंच झालं आहे. या दोन दिग्गज अभिनेत्यांची ही जुगलबंदी झी मराठीवरील ‘पसंत आहे मुलगी’ या मालिकेतून सोमवार ते शनिवार रात्री ८.०० वा. प्रेक्षकांना बघायला मिळेल.