थेरगाव, दि. 13 मे – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी आज (सोमवारी) सकाळी साडेआठच्या सुमारास थेरगावच्या संचेती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय (बूथ नं 218) या मतदान केंद्रावर परिवारासह रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला.
खासदार बारणे हे पत्नी सरिता, पुत्र प्रताप व विश्वजीत, सून स्नेहा यांच्यासह मतदान केले. त्यावेळी त्यांचा अडीच वर्षांचा नातू राजवीर काही त्यांच्या समवेत होता.
संपूर्ण मतदारसंघात मतदारांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. सर्व मतदार देशहितासाठी, दिवसाच्या उज्वल भवितव्यासाठी, देशाच्या सुरक्षेसाठी, विकासासाठी उस्फूर्तपणे मतदान करीत आहेत. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे. 2019 मध्ये आपल्याला दोन लाख 31 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. यावेळी ते रेकॉर्ड मोडून आपण नवीन विक्रम प्रस्थापित करू, असा विश्वास बारणे यांनी मतदान केल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला.
मतदानाला निघण्यापूर्वी बारणे यांनी सकाळी देवदर्शन केले त्यानंतर घरातील महिलांनी औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या