पुण्यातील नोटा बदलण्याचा धंदा ..४० व्यापारी सीबीआय च्या लिस्टवर ?
पुणे : सीबीआयच्या पथकाने गुरुवारी मार्केट यार्ड येथील तब्बल 30 व्यापा-यांच्या दुकानांवर छापे टाकल्याचे वृत्त आहे . . काही दिवसापूर्वीच वर्ल्ड वाईल्ड आॅईल फिल्ड मशीन्स कंपनीसह ईशान्य मोटर्सविरुद्ध बेकायदेशीरपणे तब्बल बारा कोटी रुपयांच्या नव्या नोटा बाळगल्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान जुन्या नोटा तगड्या कमिशनवर बदलून देणारी व्यापा-यांची मोठी साखळी उघड झाली होती. यामध्ये मार्केट यार्डमधील जवळपास ३० व्यापा-यांचा समावेश असल्याचेही समोर आले होते. सीबीआयच्या पथकाने या व्यापा-यांकडून महत्वाची कागदपत्रे आणि ‘कमिशन नोट’ जप्त केल्याचे सांगण्यात येते .
प्राप्तिकर विभागाने वर्ल्ड आॅईल फिल्ड मशीन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या जप्त केलेल्या तब्बल बारा कोटी रुपयांच्या नव्या नोटांच्या तपासामध्ये नोटा बदलून देणारे मोठे रॅकेट समोर आले आहे. या रॅकेटमध्ये गुलटेकडी, मार्केट यार्डसह धनकवडीमधील मोठे व्यापारी सहभागी असल्याचे निष्पन्न झाले असून या साखळीत काम करणारे तब्बल ४० मोठे मासे प्राप्तिकर विभागाच्या ‘स्कॅनर’ खाली आले असून याच व्यापा-यांची जंत्री सीबीआयने तयारकेल्याचे समजते .
वर्ल्ड वाईड आॅलई फिल्ड कंपनीने कार्यालयात तसेच महाराष्ट्र बँकेच्या पर्वती शाखेतील लॉकर्स तब्बल ११ कोटी ७० लाखांची रोकड मिळून आली होती. कंपनीने ही रक्कम ईशान्य मोटर्सच्या सत्येन गथानी आणि अन्य काही व्यापा-यांच्या मदतीने ‘व्हाईट’ करुन घेतल्याचे समोर आले होते. कंपनीच्या सुधीर पुराणिक आणि मंगेश छत्रे यांच्या जबाबामधून गथानीचे नाव समोर आले होते. गथानीकडून आणखी चार नावे उघड झाली होती. तर या चार व्यापा-यांकडून जवळपास ४० जणांची साखळी नोटा बदलून देण्याच्या रॅकेटमध्ये काम करीत असल्याचे समोर आले होते.