खासदार अॅड. वंदना चव्हाण यांच्याकडून दौंडमधील खोर गाव दत्तक
पुणे :
मावळ तालुक्यातील सुदंबरे गावानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी दौंड तालुक्यातील खोर हे गाव दत्तक घेतले आहे. ‘पंतप्रधान आदर्श सांसदग्राम’ संकल्पनेतील दुसर्या टप्प्यामध्ये खा.वंदना चव्हाण यांनी हे गाव दत्तक घेतले आहे. प्रत्येक खासदाराने प्रत्येक वर्षी एक गाव दत्तक घेऊन तेथे विविध उपक्रम योजना विकास कार्यक्रम आयोजित करून गावाला प्रगतीपथावर नेणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
खोर गावाला दत्तक घेतल्यानंतर योजनेतील उपक्रमांचा प्रारंभ नुकताच झाला.
ग्रामस्थांबरोबर नुकत्याच झालेल्या जाहीर ग्रामसभेला खासदार सुप्रिया सुळे, खा.अॅड.वंदना चव्हाण, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार रमेश थोरात, उपाध्यक्ष अर्चना घारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार, तहसीलदार उत्तम दिघे, यांच्यासह मोठ्यासंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
खासदार अॅड. वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या सुचनेनुसार हे गाव निवडलेले आहे. मुलभूत सोयीसुविधा गावकर्यांपर्यंत पोहोचाव्यात हा आदर्श सासंद ग्राम योजनेचा मुख्य हेतू आहे. त्या संकल्पनेनुसार खोर येथे मुलभूत योजना राबविण्यात येऊन आदर्श सासंद ग्राम करण्यासाठी कटीबद्ध आहे.’