पुणे-नयना पुजारी खूनप्रकरणातील दोषींना न्यायालयाकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली ह. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने योगेश राऊत, महेश ठाकूर, विश्वास कदम या तिन्ही दोषींना फाशीची शिक्षा ठोठावली . तर राजेश चौधरीला हा या प्रकरणातील माफीचा साक्षीदार होता.
आज शिक्षा सुनावण्यापूर्वी दोषींना न्यायालयासमोर स्वत:ची बाजू मांडण्याची अखेरची संधी देण्यात आली. यावेळी योगेश राऊत याने आपण हा गुन्हा केला नसल्याचा दावा केला. न्यायालयात आणताना आणि नेताना पोलिसांकडून आपल्यावर दबाव आणला जातो. मला या गुन्ह्यात गोवण्यात आले आहे, असे त्याने म्हटले. तसेच राजेश चौधरी हादेखील गुन्ह्यात सहभागी होता. त्यामुळे त्याला शिक्षा करण्यात यावी, असे राऊतने म्हटले. मात्र, न्यायालयाने त्याची ही मागणी फेटाळून लावली. माझ्या आईचा, लहान मुलीचा आणि पत्नीचा विचार करून शिक्षा कमी करावी, अशी विनंतीही योगेश राऊत याने केली. तर महेश ठाकूर याने न्यायालयासमोर काहीही बोलण्यास नकार दिला. या प्रकरणातील तिसरा दोषी विश्वास कदम यानेही न्यायालयासमोर आपली बाजू मांडताना माफीचा साक्षीदार झालेल्या राजेश चौधरीने हा गुन्हा केल्याचा दावा त्याने केला. त्यामुळे राजेश चौधरीला शिक्षा देण्याची मागणी विश्वास कदमने केली.
तर सरकारी पक्षाचे वकील हर्षद निंबाळकर यांनी दिल्लीतील निर्भया प्रकरणाचा दाखला देत तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. अॅड. निंबाळकर यांनी या खटल्यातील क्रौर्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. तिन्ही नराधामांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करताना वकील निंबाळकर यांनी यापूर्वी घडलेल्या अनेक प्रकरणांचे आणि त्यामध्ये न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचे दाखले दिले. आरोपींनी अत्यंत थंड डोक्याने हे घृणास्पद कृत्य केल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तर बचावपक्षाच्या वकिलांनी माफीचा साक्षीदार राजेश चौधरी याला सहआरोपी करण्याची मागणी केली आहे.