पुणे : येरवडा येथे पुणे महापालिकेकडून सुरु असलेल्या ड्रेनेज पाईपलाईनच्या खोदकामात महावितरणच्या 22 केव्हीच्या चार भूमिगत वीजवाहिन्या तुटल्याने मंगळवारी (दि. 9) वाडिया व बंडगार्डन परिसरात विजेच्या भारव्यवस्थापनासाठी नाईलाजाने तीन तासांचे चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागले. त्यामुळे या परिसरातील सुमारे 9 हजार वीजग्राहकांची आज दिवसभर गैरसोय झाली.
दरम्यान, या भूमिगत वाहिन्यांची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरु आहे. ड्रेनेजच्या खड्ड्यामध्ये साचलेल्या पाण्याचा पंपाद्वारे उपसा करून आठ जाईंटद्वारे वाहिन्यांचा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत पूर्ण होणार आहे.
याबाबत माहिती अशी, की येरवड्यामधील आंबेडकर चौकात इंद्गप्रस्थ गार्डन येथे पुणे महापालिकेकडून पावसाळी ड्रेनेज पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे. आज पहाटे सव्वादोन वाजता पाईपलाईनसाठी सुरु असलेल्या खोदकामात महावितरणच्या 22 केव्हीच्या चार भूमिगत वीजवाहिन्या तुटल्या व नायडू उपकेंद्गाला होणारा वीजपुरवठा बंद पडला. केवळ एकाच इनकमिंग वाहिनीद्वारे नायडू उपकेंद्गाला वीजपुरवठा सुरु राहिल्याने भारव्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण झाला. परिणामी नायडू उपकेंद्गातील आऊटगोईंग 11 केव्हीच्या सहा व 22 केव्हीच्या 3 वीजवाहिन्यांवरील वीजपुरवठा विस्कळीत झाला. त्यामुळे ताडीवाला रोड, ढोले पाटील रोड, मंगलदास रोड, नालोर रोड, प्रायव्हेट रोड, आरटीओ ऑफीस परिसर, लडकतवाडी, सोहराब हॉल, बंडगार्डन रोड, बोट क्लब रोड आदी परिसरात नाईलाजाने आज चक्राकार पद्धतीने तीन तासांचे भारनियमन करण्यात आले.
येरवडा येथे तुटलेल्या या चारही वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम या आज पहाटेपासूनच सुरु करण्यात आले. रास्तापेठ मंडलचे अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे, कार्यकारी अभियंता श्री. मुरलीधर येलपले, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. दत्तात्रय साळी यांनी उपस्थित राहून दुरुस्ती कामाला वेग दिला. तथापि पाईपलाईनच्या खोदकामात पाणी साचल्याने दुरुस्ती कामात अडथळे येत होते. या चार वाहिन्यांना एकूण 8 ठिकाणी जाईंट देण्याचे काम सुरु असून ते रात्री उशिरापर्यंत पूर्ण होणार आहे.