पुणे-खासदार संजय काकडे यांना सामान्य जनतेचा पाठिंबा मोठा आहे हे वारंवार दिसून आले आहे. सामान्य माणसांत मिसळणारे खासदार काकडे आहेत. भाजपकडे त्यांच्याइतका प्रबळ उमेदवार नाही. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत संजय काकडे भाजपकडून उमेदवार असतील तर, काँग्रेसला पुणे लोकसभा अवघड जाऊ शकते, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व माजी महापौर प्रशांत जगताप यांनी येथे व्यक्त केले.
मंडई विद्यापीठ कट्टाच्या वतीने प्रत्येक शनिवारी हॉटेल कल्पना कट्टा आयोजित केला जातो. या कट्ट्याच्या वर्षपूर्तीनिमित्त आज खासदार संजय काकडे विशेष निमंत्रित होते. खासदार काकडे यांच्याबरोबरच माजी महापौर प्रशांत जगताप, सरहदचे संजय नहार सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र सावंत, नगरसेवक बंडु आंदेकर, नगरसेवक धीरज घाटे, नगरसेवक शंकर पवार, माजी नगरसेवक अनिल जाधव व उदयकांत आंदेकर, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, माथाडी कामगार संघटनेचे शहराध्यक्ष दिनेश धाडवे, महाराष्ट्र केसरी राजेश बारगुजे, शिवसेना शहर संघटक राजेंद्र शिंदे, झोपडपट्टी आघाडीचे अध्यक्ष विशाल पवार आदी मान्यवर निमंत्रित होते. याप्रसंगी मंडई विद्यापीठ कट्टाचे अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे, रविंद्र जेधे, अनिल बिडलाण, हर्षद मालुसरे आदी संयोजक उपस्थित होते.
पुढील वर्षात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसंदर्भात व पुणे लोकसभा मतदार संघातून इच्छुक असल्याप्रकरणी खासदार संजय काकडे यांना उपस्थितांनी प्रश्न विचारले. त्यावर खासदार काकडे यांनी आपण निवडणूक लढविणार असल्याचे पुन्हा एकदा सांगितले. माझी राज्यसभेची खासदारकी 2020 पर्यंत आहे. शिवाय मागच्यावेळी पाठिंबा दिलेल्या 52 आमदारांपैकी किमान 50 आमदार पुन्हा निवडून येतील. त्यामुळे मी परत राज्यसभेवर जाऊ शकतो. पुण्यासाठी आजही काम करतोच आहे. पण त्याला काही मर्यादा पडतात. लोकसभेचा खासदार झाल्यावर पुणेकरांच्या विकासासाठी काम करणे ही माझी नैतिक जबाबदारी ठरते. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवायचा निर्णय घेतला. तसेच, भाजपसाठी दीड लाख सदस्य नोंदणी, महापालिका निवडणुकीत पक्षासाठी केलेले काम आणि बहुजन चेहरा या गोष्टी पाहता आपल्याला डावलले जाणार नाही. भाजपकडून मला निश्चितपणे उमेदवारी मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
निवडणूक कोणाला कमी दाखविण्यासाठी लढवायची नाही. पुण्यासाठी मी आजपर्यंत काम करीत आलो आहे. खासदार तर मी आताही आहेच. परंतु, लोकसभेचा खासदार झाल्यावर पुणेकरांचे प्रश्न व समस्या सोडवणे व त्यांच्या विकासासाठी काम करणे ही माझी नैतिक जबाबादारी बनते. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे सांगतानाच पक्षासाठी केलेल्या कामामुळेच भाजप आपल्याला उमेदवारी नाकारणार नाही, असा ठाम विश्वास राज्यसभा खासदार व भाजपचे सहयोगी सदस्य संजय काकडे यांनी व्यक्त केला.
प्रत्येक शनिवारी विविध क्षेत्रातील मान्यवरांना आम्ही निमंत्रित करतो. कल्पना कट्ट्याला एक वर्ष झाले आहे. येथे संबंधीत क्षेत्रीतील व्यक्तींसोबत विषयवार चर्चा होते. त्यातून मार्गदर्शन मिळते. अनेक प्रश्नांची उकल होते, असे बाळासाहेब मालुसरे यांनी सांगितले