३३ हजार ७८० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त; ६३ शेड, ६ स्टॉल आणि ९ काउंटरवरही कारवाई
पुणे : शहरातील अतिक्रमणांविरोधात पुणे महानगरपालिकेने सुरू केलेली धडक मोहीम कायम असून, शुक्रवारी (२७ नोव्हेंबर २०२६) कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील चांदणी चौक ते रामनदी परिसरात मोठ्या प्रमाणावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या मोहिमेत ७५ आस्थापनांमधील अनधिकृत कच्च्या व पक्क्या बांधकामांसह एकूण ३३ हजार ७८० चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली.
महापालिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग आणि बांधकाम विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही विशेष मोहीम राबविण्यात आली. सार्वजनिक रस्ते, पदपथ तसेच फ्रंट आणि साईड मार्जिनमधील अनधिकृत बांधकामांना या कारवाईत लक्ष्य करण्यात आले.
व्यावसायिक आस्थापनांच्या अतिक्रमणांवर धडक कारवाई
चांदणी चौक ते रामनदी परिसरातील रस्ते आणि पदपथांवर अनधिकृत व्यावसायिक स्टॉल, काउंटर, शेड, टेन्ट आणि अन्य साहित्य ठेवण्यात आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. पादचाऱ्यांनाही ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत होता.
या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पथकाने जेसीबीच्या साहाय्याने अनधिकृत बांधकामे निष्कासित केली. दुकानांबाहेर अनधिकृतपणे लावण्यात आलेले बोर्ड, बॅनर आणि अन्य जाहिरात साहित्यही हटविण्यात आले.
कारवाईचा तपशील
- अनधिकृत शेड – ६३
- निष्कासित स्टॉल – ६
- काउंटर – ९
- कच्ची व पक्की बांधकामे – ७५ आस्थापना
- सिलेंडर – ३
- एकूण निष्कासित बांधकामाचे क्षेत्रफळ – ३३,७८० चौरस फूट.
कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेले साहित्य कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या महापालिका गोदामात जमा करण्यात आले आहे.
दोन जेसीबी, ३७ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मोहीम
या कारवाईसाठी दोन जेसीबी, एक गॅस कटर आणि दोन ओपन ट्रकचा वापर करण्यात आला. तसेच अभियंते, अतिक्रमण अधिकारी, निरीक्षक, सहायक निरीक्षक, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे १० जवान आणि १७ बिगारी सेवक असे एकूण ३७ अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
फ्रंट आणि साईड मार्जिनमधील बांधकामांवरही हातोडा
बांधकाम विकास विभागाच्या झोन क्रमांक तीनच्या पथकाने चांदणी चौक ते रामनदी परिसरातील फ्रंट आणि साईड मार्जिनमध्ये उभारण्यात आलेल्या अनधिकृत कच्च्या व पक्क्या बांधकामांवर निष्कासनाची कारवाई केली.
या मोहिमेत एकूण ३३ हजार ७८० चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामे हटविण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर, परिमंडळ क्रमांक दोनचे उपायुक्त अविनाश सपकाळ आणि कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त सुहास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
बांधकाम विभागाचे भास्कर हांडे, अजय फाले, विभागीय अतिक्रमण अधिकारी नारायण साबळे, अतिक्रमण अधिकारी श्रीकृष्ण सोनार, अतिक्रमण निरीक्षक राहुल डोके, सहायक निरीक्षक सागर गव्हाळे, वैभव जगताप, वैभव जाधव आणि अनिल देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पुन्हा अतिक्रमण केल्यास कठोर कारवाईचा इशारा
सार्वजनिक रस्ते, पदपथ तसेच फ्रंट मार्जिन अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी यापुढेही अशा प्रकारच्या धडक मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार आहेत. सार्वजनिक जागांवर अनधिकृत अतिक्रमण करणाऱ्या आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, महापालिकेच्या या धडक कारवाईनंतर संबंधित परिसरात पुन्हा अतिक्रमणे होऊ नयेत, यासाठी प्रशासन कोणत्या कायमस्वरूपी उपाययोजना करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

