रखडलेल्या विकासकामांसाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट; उर्वरित भूसंपादन आणि प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी
पुणे : बालेवाडी, वाकड आणि म्हाळुंगे परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेतली. बालेवाडी-वाकड जोडरस्ता आणि म्हाळुंगे नगररचना योजनेसह विविध विकासकामांमधील प्रशासकीय अडथळे दूर करून ही कामे तातडीने मार्गी लावण्याची मागणी त्यांनी केली.
बालेवाडी-वाकड जोडरस्त्याचे भूसंपादन तातडीने पूर्ण करा!
बालेवाडी-वाकड जोडरस्त्यासाठी आवश्यक असलेली उर्वरित भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करून प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी बालवडकर यांनी आयुक्तांकडे केली.
हा जोडरस्ता पूर्ण झाल्यानंतर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून, दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
म्हाळुंगे नगररचना योजनेला गती देण्याची मागणी
म्हाळुंगे परिसराच्या नियोजनबद्ध विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) प्रशासकीय अडथळे दूर करण्याबाबतही बालवडकर यांनी आयुक्तांशी चर्चा केली. योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या पुढील प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली.
यासोबतच विविध प्रलंबित विकासकामांची सद्यस्थिती, त्यातील अडचणी आणि संभाव्य उपाययोजनांबाबत आयुक्तांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
पुण्याचा विकास घोषणांमधून नव्हे, प्रत्यक्ष कामातून दिसला पाहिजे!
पुण्याचा विकास केवळ घोषणांपुरता मर्यादित न राहता तो प्रत्यक्ष कामातून दिसला पाहिजे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित रस्ते, पायाभूत सुविधा आणि नियोजनबद्ध विकासाचे प्रश्न वेळेत मार्गी लागणे आवश्यक आहे. प्रलंबित विकासकामे पूर्णत्वास नेण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे अमोल बालवडकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, बालवडकर यांच्या या भेटीनंतर बालेवाडी-वाकड जोडरस्ता आणि म्हाळुंगे टीपी स्कीमसंदर्भात महापालिका प्रशासन कोणती ठोस कार्यवाही करणार, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

