मोदी–देवेंद्र सरकारच्या ‘सेव्ह फॉरेस्ट’ अभियानावर ॲड. तोसिफ शेख यांचा सवाल; संविधान दिनापासून भीम आर्मी आणि जनशक्ती संघाचे आंदोलन
पुणे : कोंढवा येथील एनआयबीएम रोड परिसरात वनविभागाकडून करण्यात येत असलेल्या वृक्षतोडीविरोधात भीम आर्मी आणि जनशक्ती संघाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६ पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती ॲड. तोसिफ शेख यांनी दिली.
वर्षानुवर्षे वाढलेली मोठी झाडे तोडून त्यांच्या जागी छोटी रोपे लावणे, हीच का वनविभागाची आणि मोदी–देवेंद्र सरकारच्या ‘सेव्ह फॉरेस्ट’ अभियानाची पर्यावरण संवर्धनाची नवी व्याख्या, असा सवाल शेख यांनी उपस्थित केला आहे.
वनविभागाकडून लेखी उत्तर नाही; केवळ तोंडी स्पष्टीकरण
एनआयबीएम रोड परिसरातील वृक्षतोडीला आक्षेप घेत २७ ऑक्टोबर २०२६ रोजी वनविभागाच्या वानवडी विभागीय कार्यालयात लेखी निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र, अद्याप त्यावर लेखी उत्तर मिळाले नसल्याचे शेख यांनी सांगितले.
तोडण्यात येणारी झाडे ग्लिरिसिडिया (Gliricidia) प्रजातीची असून ती उपयोगाची नसल्याने त्यांच्या जागी नवीन रोपे लावण्यात येणार असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तोंडी सांगितल्याचा दावा त्यांनी केला आहे.
अनेक वर्षांपासून सावली देणारी, कार्बन डायऑक्साइड शोषून घेणारी आणि जैवविविधतेला आधार देणारी प्रौढ झाडे तोडून त्यांची पर्यावरणीय भरपाई छोट्या रोपांच्या माध्यमातून कशी होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पुणेकरांना पाण्याची टंचाई; नव्या रोपांसाठी पाणी आणणार कुठून?
पुणे शहरातील अनेक भागांत नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक गृहनिर्माण सोसायट्यांना पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याचे शेख यांनी नमूद केले.
अशा परिस्थितीत नव्याने लावण्यात येणाऱ्या रोपांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी वनविभागाकडे कोणते नियोजन आहे? पाण्याअभावी ही रोपे जगली नाहीत तर त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार, असे सवालही त्यांनी केले.
वृक्षारोपणातील कथित साडेबारा कोटींच्या भ्रष्टाचाराचाही उल्लेख
पुणे वनविभागाचे अधिकारी जालिंदर पाटील यांनी वृक्षारोपणाच्या कामातील सुमारे १२.५० कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता, असे शेख यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर एनआयबीएम रोड परिसरातील वृक्षतोडीची कारणे, आवश्यक परवानग्या, प्रस्तावित वृक्षारोपणाचा खर्च आणि रोपांच्या संगोपनाचे नियोजन याबाबत वनविभागाने लेखी माहिती जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
वृक्षतोडीमागे विकासकांचे हित आहे का, असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, या आरोपांची स्वतंत्र पडताळणी झालेली नाही.
संविधान दिनापासून बेमुदत धरणे आंदोलन
वृक्षतोडीला विरोध आणि वनविभागाच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी करण्यासाठी भीम आर्मी आणि जनशक्ती संघाच्या वतीने शांततापूर्ण बेमुदत धरणे आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. पर्यावरणप्रेमी, सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिकांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
आंदोलनाचे स्थळ आणि वेळ :
- दिनांक : गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६
- वेळ : सकाळी ११ वाजल्यापासून
- स्थळ : एनआयबीएम चौक, बेकर पॉइंटसमोर, कोंढवा, पुणे.
- आयोजक : भीम आर्मी आणि जनशक्ती संघ.
दरम्यान, संबंधित वृक्षतोडीची अधिकृत कारणे, वृक्षारोपणाचे नियोजन आणि आंदोलनकर्त्यांनी केलेल्या आरोपांबाबत वनविभागाची भूमिका समोर अद्याप समोर आलेली नाही .

