ज्येष्ठ दलित साहित्यिकाची एकमताने निवड; २७ ते ३० जानेवारी २०२७ दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संमेलन
पुणे : मराठी साहित्यविश्वाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरणाऱ्या १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ दलित साहित्यिक, कादंबरीकार आणि समीक्षक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत आज, मंगळवारी (२४ नोव्हेंबर) त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
मराठी साहित्य संमेलनाच्या शतकमहोत्सवी सोहळ्याचे अध्यक्षपद भूषविण्याचा बहुमान डॉ. लिंबाळे यांना मिळाला आहे.
उपेक्षितांच्या वेदनांना साहित्यातून दिली वाचा
सोलापूर जिल्ह्यातील हन्नूर येथे जन्मलेल्या डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून सामाजिक विषमता, जातिव्यवस्था आणि वंचित घटकांच्या संघर्षाचे वास्तव मांडले. कथा, कविता, कादंबरी, आत्मकथन आणि समीक्षा अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.
त्यांनी नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्राध्यापक आणि संचालक म्हणूनही काम केले आहे.
‘अक्करमाशी’ ते ‘सनातन’चा साहित्यिक प्रवास
डॉ. लिंबाळे यांचे ‘अक्करमाशी’ हे आत्मकथन मराठी दलित साहित्यविश्वातील महत्त्वाची साहित्यकृती मानली जाते. त्यांच्या साहित्यकृतींचे विविध भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.
‘सनातन’ या कादंबरीसाठी त्यांना २०२० चा प्रतिष्ठेचा ‘सरस्वती सन्मान’ प्रदान करण्यात आला होता. ‘हिंदू’, ‘उपल्या’, ‘बहुजन’ आणि ‘दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र’ यांसारख्या साहित्यकृतींमधून त्यांनी सामाजिक प्रश्नांची मांडणी केली आहे.
पुण्यात चार दिवस साहित्याचा जागर
शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २७ ते ३० जानेवारी २०२७ या कालावधीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात येणार आहे.
३१ जानेवारी रोजी पुणे ग्रँड टूर आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचा समारोप होणार असल्याने वाहतूक आणि प्रशासकीय व्यवस्थेचा विचार करून साहित्य संमेलनाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.
मराठी साहित्य संमेलनाच्या शंभराव्या वर्षात दलित साहित्य चळवळीतील एका महत्त्वाच्या साहित्यिकाकडे अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. आता डॉ. शरणकुमार लिंबाळे आपल्या अध्यक्षीय भाषणातून कोणत्या साहित्यिक आणि सामाजिक प्रश्नांना स्पर्श करणार, याकडे साहित्यविश्वाचे लक्ष लागले आहे.

