समता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश प्रत्येकाने आचरणात आणावा; पुण्यातील गुरु नानक दरबार गुरुद्वाराला भेट
पुणे : शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानक देवजी यांचे विचार संपूर्ण मानवजातीला दिशा देणारे असून, त्यांनी दिलेला समता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश प्रत्येकाने आपल्या जीवनात आचरणात आणावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.
गुरुनानक जयंतीनिमित्त पुण्यातील कॅम्प परिसरातील गुरु नानक दरबार गुरुद्वाराला त्यांनी आज (२४ नोव्हेंबर) भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी शीख बांधवांना गुरुनानक जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
गुरुनानक देवजींचा ‘एक ओंकार’ हा विचार संपूर्ण मानवजात एक असल्याचा संदेश देतो. ईश्वराचे स्मरण करणे, प्रामाणिकपणे कष्ट करणे आणि आपल्या उत्पन्नातील वाटा इतरांसोबत वाटून घेणे, या तीन सूत्रांमध्ये आदर्श जीवनाचे संपूर्ण तत्त्वज्ञान सामावलेले असल्याचे पवार यांनी सांगितले.
लंगर परंपरा हे सामाजिक समतेचे जिवंत उदाहरण
गुरुद्वारातील लंगर परंपरा हे गुरुनानक देवजींच्या विचारांचे जिवंत उदाहरण आहे. जात, धर्म, श्रीमंत-गरीब असा कोणताही भेद न करता सर्वजण एकाच पंगतीत भोजन करतात. माणसामाणसांमधील अंतर कमी करून समाजाला एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या परंपरेतून होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्रात मानवतेचे विचार अधिक व्यापकपणे रुजवूया
महाराष्ट्र ही संत आणि समाजसुधारकांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्मांचा आदर करून सर्वांना सोबत घेण्याचा आदर्श घालून दिला. याच महाराष्ट्रात गुरुनानक देवजींचे समता, बंधुभाव आणि मानवतेचे विचार अधिक व्यापकपणे रुजविणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे पवार म्हणाल्या.
पुण्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनातील गुरुद्वारा संस्थेच्या योगदानाचाही त्यांनी गौरव केला. महाराष्ट्र अधिक समृद्ध, सुसंस्कृत आणि एकजूट बनविण्यासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शीख बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

