IDSP व PM-ABHIM अंतर्गत सर्वेक्षण अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेच्या प्रयोगशाळेची पायलट प्रोजेक्टसाठी निवड
पुणे : पुणे महापालिकेच्या प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या ‘तीव्र ताप (AFI) आणि अतिसार (ADD)’ आजारांच्या सर्वेक्षणासंदर्भात तीन दिवसीय विशेष कार्यशाळा संपन्न झाली. केंद्र सरकारच्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम (IDSP) आणि PM-ABHIM अंतर्गत या सर्वेक्षणासाठी पुणे महापालिकेच्या प्रयोगशाळेची पायलट प्रोजेक्ट म्हणून निवड करण्यात आली आहे.
या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पुणे महापालिकेच्या मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिटमध्ये २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या मायक्रोबायोलॉजी विभागात झालेल्या या प्रशिक्षणात वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, मायक्रोबायोलॉजिस्ट आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांसह ७९ जण सहभागी झाले.
कार्यशाळेत पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे, ऑफीस इन्चार्ज MSU तथा सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. सुनीता माने, उप अधिष्ठाता व विभागप्रमुख डॉ. विशाल कुलकर्णी, NCDC कडील डॉ. जैनेंद्र, CDC चे उपसंचालक डॉ. विल्यम अब्रम आणि Jhpiego चे सहकारी संचालक डॉ. भाविन वडेरा उपस्थित होते.
कार्यशाळेदरम्यान GOI, IDSP, NCDC, CDC, जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि Jhpiego यांसारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांच्या तज्ज्ञांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. तीव्र ताप आणि अतिसाराच्या निदानासाठी RT-PCR, RDT, ELISA, BioFire टेस्टिंग आणि IHIP पोर्टलवरील डेटा एंट्री याबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली.
या पायलट प्रोजेक्टअंतर्गत पुणे शहरात तीन सेंटिनेल साइट्स निश्चित करण्यात आल्या आहेत. या साइट्सवर Molecular आणि Serological निदान तंत्रांचा वापर करून रुग्णांच्या तीव्र बहु-रोगजनक निदान चाचण्या वेळेत करणे शक्य होणार असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.
या प्रकल्पामुळे तीव्र ताप आणि अतिसाराशी संबंधित आजारांचे वेळेत निदान, रोगप्रसाराचे प्रभावी सर्वेक्षण आणि आरोग्य यंत्रणेची प्रतिसादक्षमता वाढण्यास मदत होणार आहे.

