नगर रोड-वाघोली क्षेत्रीय कार्यालयाची स्वच्छता मोहीम; तलावातील कचरा काढून परिसर स्वच्छ, अधिकाऱ्यांकडून स्वच्छतेची शपथ
पुणे, दि. १ ऑक्टोबर : पुणे महापालिकेच्या ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियानांतर्गत नगर रोड-वाघोली क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने बुधवारी ‘श्रमदान एक दिवस, एक तास, एक साथ’ अभियान राबविण्यात आले. हरणतळे या नैसर्गिक तलावाच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या उद्देशाने तलावाच्या सभोवतालचा परिसर तसेच तलावातील कचरा काढून व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त संतोष वारुळे आणि परिमंडळ क्रमांक १च्या उप आयुक्त आशा राऊत यांच्या नियंत्रणाखाली ही मोहीम राबविण्यात आली. तलाव परिसरातील कचरा गोळा करून स्वच्छता करण्यात आली तसेच अधिकाऱ्यांच्या हस्ते तलावाच्या सभोवताली २५ पिंपळांच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची शपथही घेतली.
या मोहिमेत महापालिका सहाय्यक आयुक्त संजय पोळ, उप अभियंता झुळूक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मिलिंद खांदोडे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक सुनील घोळवे, आरोग्य निरीक्षक गोपाळकृष्ण नायडू, स्वप्निल कुताळ, सचिन लडकत, संजय भुसारे, संतोष वाघमारे, चेतन गरुड, तसेच कनिष्ठ अभियंता वसंत शिंदे सहभागी झाले.
याशिवाय सर्व मुकादम, महापालिकेचे सफाई कामगार, स्वच्छ संस्थेचे समन्वयक व सभासद, तसेच सुमित फॅसिलिटी लिमिटेडचे सुपरवायझर आणि कर्मचारी यांनीही श्रमदानात सहभाग घेतला.
हरणतळे तलावाच्या परिसरात स्वच्छता राखण्याबरोबरच नैसर्गिक जलस्रोताचे संवर्धन करण्यासाठी अशा मोहिमांना सातत्य देण्यावर भर देण्यात आला. तलाव परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबर वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला.

