▪️ जल जीवन मिशन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व स्वच्छ भारत मिशनच्या योजनांचा आढावा
पुणे, दि.१: जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन, जलस्रोतांचे बळकटीकरण आणि जलसंधारणाच्या कामांना गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीच्या बैठकीत दिले.
ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत सुरू असलेल्या जल जीवन मिशन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत विविध योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पाणीटंचाईची संभाव्यता असलेल्या गावांमध्ये भविष्यात टँकरची गरज निर्माण होऊ नये, यासाठी आतापासूनच प्रभावी नियोजन करण्यावर विशेष भर द्यावा, जलस्रोतांचे बळकटीकरण, नाला खोलीकरण, जलसंधारणाची कामे तसेच उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन आदी कामे वेगाने पूर्ण करावीत.
७५ टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजना तातडीने कार्यान्वित कराव्यात, टँकरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी तात्पुरत्या उपायांऐवजी कायमस्वरूपी आणि शाश्वत पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण करण्याला प्राधान्य द्यावे, टँकरची गरज भासण्याची शक्यता असलेल्या गावांची संभाव्यता लक्षात घेऊन त्या गावांतील प्रलंबित पाणीपुरवठा योजनांना विशेष प्राधान्य देत युद्धपातळीवर कामे पूर्ण करावीत, अशा सूचना श्री. डुडी यांनी दिल्या.
जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशनचे सदस्य सचिव तथा जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमित पाथरवट यांनी संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून योजनांच्या अंमलबजावणीतील अडथळे तातडीने दूर करावेत, योजनांसाठी प्राप्त झालेला निधी वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने खर्च करून त्याचा प्रभावी विनियोग सुनिश्चित करावा,असे सांगितले.
बैठकीला जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, भूजल सर्वेक्षण, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी,जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

