पुणे सत्र न्यायालयाचे तपास अधिकाऱ्यावर गंभीर ताशेरे; कारवाईचे निर्देश, नुकसानभरपाई तपास अधिकाऱ्याकडून वसूल करण्याचे निरीक्षण
पुणे : सर्जेराव क्षीरसागर खून प्रकरणात आरोपी फजालू हिट्टू चौहान याची पुणे सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सरकारी पक्ष आरोपीविरुद्ध खुनाचा आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे नमूद करताना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. एम. भोसले यांनी तपासातील गंभीर त्रुटींवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. न्यायालयाने तपास अधिकारी पोलिस निरीक्षक संदीप विलासराव जगताप यांनी खुनासारख्या गंभीर गुन्ह्याचा तपास यशस्वी झाल्याचे दाखवण्यासाठी खोटे आणि बनावट पुरावे तयार केल्याचे स्पष्ट निरीक्षण नोंदवले.
या खटल्यात फजालू हिट्टू चौहान याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत खुनाचा आरोप होता. त्याला 30 नोव्हेंबर 2016 रोजी अटक करण्यात आली होती. 24 सप्टेंबर 2026 रोजी न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली.
प्रकरणानुसार, 26 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री सर्जेराव क्षीरसागर भाजी आणण्यासाठी घराबाहेर पडले होते. त्यानंतर ते घरी परतले नाहीत. 29 नोव्हेंबर रोजी कॅनॉल रोडलगतच्या एका गोदामात त्यांचा मृतदेह आढळला. शवविच्छेदनात छातीवर झालेल्या बोथट मारामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. न्यायालयाने सर्जेराव यांचा मृत्यू हा हत्या असल्याचे मान्य केले; मात्र ही हत्या आरोपी चौहान यानेच केली हे सरकारी पक्ष सिद्ध करू शकला नाही.
कथित फोन कॉललाच CDRचा आधार नाही
सरकारी पक्षाच्या कथेनुसार, सर्जेराव यांच्या मोबाइलवरून त्यांच्या मुलगा निलेश यांना फोन करण्यात आला होता. मात्र दोन्ही मोबाइल क्रमांकांच्या कॉल डिटेल रेकॉर्डमध्ये 26 ते 27 नोव्हेंबरच्या रात्री असा कोणताही कॉल झाल्याचे आढळले नाही. ही बाब तपास अधिकाऱ्यानेही उलटतपासणीत मान्य केल्याचे न्यायालयाने नमूद केले.
याचप्रमाणे 29 नोव्हेंबर रोजी ज्योती आणि आरोपी यांच्यात कथित संभाषण झाल्याचा दावा करण्यात आला होता; मात्र CDRमध्ये त्या वेळेसही संबंधित दोन क्रमांकांदरम्यान कोणताही कॉल नोंदलेला नव्हता. त्यामुळे कथित संभाषण आणि त्यावर आधारित आवाजाच्या नमुन्याबाबत गंभीर संशय निर्माण झाला.
मोबाइल जप्तीच्या कथेतही विसंगती
पोलिसांनी आरोपीकडून मृत सर्जेराव यांचा काळ्या रंगाचा सॅमसंग मोबाइल जप्त केल्याचा दावा केला होता. मात्र न्यायालयात काळा मोबाइल सादरच झाला नाही. त्याऐवजी सादर झालेला सोनेरी/चंदेरी मोबाइल निलेश यांनी स्वतःचा असल्याचे ओळखले.
पंच साक्षीदाराच्या जबाबातून जप्त मोबाइलमध्ये सिमकार्ड नव्हते आणि तपास अधिकाऱ्याने स्वतःचे सिमकार्ड त्या मोबाइलमध्ये घालून मिस्ड कॉल दिल्याचे समोर आले. या प्रक्रियेतून तो मोबाइल मृत व्यक्तीचा असल्याचे कसे सिद्ध होऊ शकते, असा थेट प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला.
बनावट ऑडिओ पुराव्याबाबत न्यायालयाचा गंभीर निष्कर्ष
न्यायालयाने पुराव्यांचे विश्लेषण करताना तपास अधिकारी जगताप यांनी आरोपी ताब्यात असताना आरोपी आणि ज्योती यांच्यातील संभाषणाचा ऑडिओ तयार करून तो निलेश यांच्या मोबाइलमध्ये नोंदवला आणि नंतर आवाज विश्लेषणासाठी पाठवला, असा स्पष्ट निष्कर्ष नोंदवला. न्यायालयाने हा बनावट पुरावा तयार केल्याचे म्हटले आहे.
न्यायालयाने पुढे नमूद केले की, कथित संभाषण प्रत्यक्षात झालेच नसताना आवाज विश्लेषणासाठी कोणता ऑडिओ पाठवण्यात आला, हे सरकारी पक्ष स्पष्ट करू शकला नाही. त्यामुळे तपासातील या भागावर न्यायालयाने गंभीर आक्षेप घेतला.
तपास अधिकाऱ्यावर कारवाईचे निर्देश
न्यायालयाने निकालाची प्रत विशेष पोलिस महानिरीक्षक, सातारा विभाग आणि पोलिस अधीक्षक, सातारा यांना पाठवून पोलिस निरीक्षक संदीप विलासराव जगताप यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
न्यायालयाने नोंदवले की, आरोपी 30 नोव्हेंबर 2016 पासून जवळपास 10 वर्षे तुरुंगात होता आणि त्यावेळी तो अवघ्या 23 वर्षांचा होता. तपास अधिकाऱ्याने तयार केलेल्या खोट्या आणि बनावट पुराव्यांमुळे त्याला एवढा काळ कारागृहात राहावे लागल्याचे निरीक्षण न्यायालयाने केले.
नुकसानभरपाई तपास अधिकाऱ्याच्या खिशातून देण्याचे निरीक्षण
न्यायालयाने आरोपीला राज्याकडून नुकसानभरपाई मागण्यासाठी स्वतंत्र कायदेशीर उपाय करण्याची मुभा दिली आहे. तसेच अशी नुकसानभरपाई मंजूर झाल्यास ती तपास अधिकारी जगताप यांच्या खिशातून दिली जावी, असेही न्यायालयाने स्पष्ट निरीक्षण नोंदवले आहे.
अखेरीस, फजालू हिट्टू चौहान याची कलम 302 अंतर्गत निर्दोष मुक्तता करण्यात आली. तो अन्य कोणत्याही गुन्ह्यात आवश्यक नसल्यास त्याची तात्काळ सुटका करण्याचे आदेश येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकांना देण्यात आले.

