अधिकारी-कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत हृदयविकाराच्या रुग्णाला तातडीची मदत देण्याचे प्रशिक्षण
पुणे : जागतिक हृदय दिनानिमित्त पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग, Revive Heart Foundation आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी CPR प्रशिक्षण, प्रात्यक्षिक आणि मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले.
आपत्कालीन परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्यास तातडीने CPR कसा द्यावा, प्राथमिक उपचार कसे करावेत आणि रुग्णाला वेळेत वैद्यकीय मदत मिळवून देणे किती महत्त्वाचे आहे, याबाबत यावेळी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणादरम्यान प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून CPR करण्याची योग्य पद्धत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना समजावून सांगण्यात आली. आपत्कालीन प्रसंगी काही मिनिटांत योग्य प्रतिसाद मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचविण्याची शक्यता वाढू शकते, या दृष्टीने अशा प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या कार्यक्रमाला पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर, Revive Heart Foundationच्या नॅशनल कोऑर्डिनेटर डॉ. किंजल गोयल, हृदयरोगतज्ज्ञ व फाउंडेशनचे रिजनल कोऑर्डिनेटर डॉ. जगदीश हिरेमठ, पुणे कोऑर्डिनेटर भीमाशंकर, रोटरी क्लबच्या दीपा भागवत यांच्यासह संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत त्वरित आणि योग्य कृती करता यावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

