पुणे : कात्रज-कोंढवा रस्ता तसेच कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यासाठी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी मंगळवारी सकाळी प्रत्यक्ष जागेवर जाऊन कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी राजस सोसायटीजवळ पूर्ण झालेल्या सर्व्हिस रस्त्यावरून वाहतूक वळवण्यात आली.
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रुती नाईक यांनी कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे काम डिसेंबर २०२६ अखेर पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले. कात्रज-कोंढवा रस्ता विकासासाठी आवश्यक असलेल्या तसेच भूसंपादनातून वगळलेल्या १० मिळकतींच्या भूसंपादनाचाही आयुक्तांनी आढावा घेतला.
भूसंपादन विभागाचे उपायुक्त निखिल मोरे यांनी संयुक्त मोजणी सुरू असल्याची माहिती दिली. क्षेत्रफळ निश्चित झाल्यानंतर संबंधित जागामालकांची संमती घेऊन एका महिन्याच्या कालावधीत रस्त्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
संबंधित जागामालकांशी प्रत्यक्ष चर्चा करून रस्त्याच्या कामासाठी आवश्यक जागा लवकरात लवकर उपलब्ध करून घेण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. चिदानंद सोसायटीच्या चेअरमन यांच्याशीही जागेवरच रस्ता विकासाच्या कामाबाबत चर्चा करण्यात आली.
दरम्यान, सर्व्हिस रस्त्याचे बहुतांश काम पूर्णत्वास आले आहे. ग्रेड सेपरेटरच्या कामात अडथळा ठरणारे विद्युत खांब आणि ट्रान्सफॉर्मर तातडीने हटविण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी विद्युत विभागाच्या मुख्य अभियंत्यांना दिल्या.
५० मीटरचे काम मार्च २०२७ पर्यंत
महापालिका आयुक्तांनी ५० मीटर रुंदीकरणाचे काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याची सूचना सर्व संबंधित यंत्रणांना दिली आहे. त्याचबरोबर संपूर्ण ८४ मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया आणि निधीची तरतूद करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
संपूर्ण ८४ मीटर रस्त्यासाठी मार्च २०२८ लक्ष्य
कात्रज-कोंढवा रस्ता पूर्ण ८४ मीटर रुंदीने विकसित करण्यासाठी मार्च २०२८ पर्यंतची मुदत संबंधित यंत्रणांना देण्यात आली आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे रखडलेल्या या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाला आता निश्चित कालमर्यादा मिळाली आहे.
या पाहणीवेळी पथ विभागाचे मुख्य अभियंता, उपायुक्त निखिल मोरे, विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता तसेच महापालिका, विशेष भूसंपादन कार्यालय आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

