कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी मंडळांचे संयुक्त निवेदन; ‘मंडळांच्या स्वायत्ततेत हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; ढोल-ताशाला पारंपरिक वाद्याचा पर्याय देण्याचा कसबा गणपती मंडळाचा विचार
पुणे – गणेशोत्सव मंडळांच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा किंवा त्यांच्या उत्सवाचे स्वरूप ठरविण्याचा ढोल-ताशा महासंघाला कोणताही अधिकार नाही. विसर्जन मिरवणुकीचे स्वरूप, चित्ररथ, वाद्ये आणि सहभागी पथके याबाबत निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार संबंधित गणेशोत्सव मंडळांचाच आहे, अशी ठाम भूमिका मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट आणि मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट यांनी घेतली आहे.दोन्ही मानाच्या गणपती मंडळांनी संयुक्त जाहीर निवेदन प्रसिद्ध करत ढोल-ताशा महासंघाच्या कथित अनधिकृत, बेजबाबदार आणि मंडळांच्या स्वायत्ततेवर अतिक्रमण करणाऱ्या कारभाराचा तीव्र निषेध केला आहे.ढोल-ताशा महासंघाने २३ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात गणेशोत्सव मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सजावटीचे चित्ररथ काढू नयेत, असा उल्लेख केला होता. हा उल्लेख पूर्णतः अनधिकृत, अनुचित आणि गणेशोत्सव मंडळांच्या निर्णयस्वातंत्र्यावर अतिक्रमण करणारा असल्याचा आक्षेप दोन्ही मंडळांनी घेतला आहे. महासंघाने स्वतःच्या अधिकारमर्यादांचे भान ठेवावे, अन्यथा अशा मनमानी कृत्यांना मंडळांकडून कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.‘मंडळांनी संधी दिल्यामुळेच ढोल-ताशा पथकांना ओळख’गणेशोत्सव हा मंडळांच्या श्रद्धा, परंपरा आणि परिश्रमातून साकार होणारा सार्वजनिक उत्सव आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीचे स्वरूप, चित्ररथ, वाद्ये आणि सहभागी पथके याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मंडळांचाच आहे. महासंघाला मंडळांना आदेश देण्याचा, नियमावली लादण्याचा किंवा त्यांच्या निर्णयांवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा अधिकार नाही, असे निवेदनात म्हटले आहे.गणेशोत्सव मंडळांनी दिलेल्या संधीमुळेच ढोल-ताशा पथकांना सार्वजनिक व्यासपीठ, प्रसिद्धी आणि ओळख मिळाली. त्यामुळे मंडळांच्या उत्सवातून प्रतिष्ठा मिळविणाऱ्या पथकांनी त्याच मंडळांना नियम शिकविण्याची भाषा करणे हा ‘कृतघ्नपणाचा कळस’ असल्याची कठोर टीकाही संयुक्त निवेदनातून करण्यात आली आहे.‘महासंघ-समितीने आपापसातील राजकारण स्वतःपुरते ठेवावे’ढोल-ताशा महासंघ आणि ढोल-ताशा समिती यांच्यातील अंतर्गत मतभेद, वर्चस्वाची चढाओढ आणि परस्परांवरील कुरघोडी ही त्यांची अंतर्गत बाब आहे. मात्र स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांना लक्ष्य करणे आणि प्रसिद्धीपत्रकांच्या माध्यमातून त्यांच्या कामकाजात हस्तक्षेप करणे निषेधार्ह असल्याचे निवेदनात म्हटले आहे.महासंघ आणि समितीने आपापसातील राजकारण स्वतःपुरते मर्यादित ठेवावे. मंडळांच्या नावाचा वापर करून प्रसिद्धी मिळविण्याचा आणि मंडळांना वेठीस धरण्याचा उद्योग तात्काळ बंद करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.‘१०० ढोल वाजवणाऱ्या पथकांवर महासंघ काय कारवाई करणार?’महासंघाशी संबंधित असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या काही पथकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी समोर येत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांना नियम सांगण्यापूर्वी महासंघाने स्वतःच्या सदस्यांवर नियंत्रण ठेवावे आणि कायद्याचे पालन सुनिश्चित करावे, असे दोन्ही मंडळांनी सुनावले आहे.यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशा महासंघाच्या जवळचे असल्याचे सांगितले जाणारे आणि त्यांच्याशी संबंधित पथकांनी तब्बल १०० ढोल वाजवून सहभाग घेतल्याचे निदर्शनास आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. या पथकांकडून नियमांचे उल्लंघन झाले असल्यास त्यांच्यावर कोणती शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे, याचे महासंघाने जाहीर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.विसर्जन मिरवणुकीदरम्यान महासंघाशी संलग्न असलेले अनेक ढोल-ताशा वादक मिरवणुकीच्या मध्यभागी येऊन सुरळीत प्रवाहात अडथळे निर्माण करत होते, असा आरोपही दोन्ही मंडळांनी केला आहे. असे वर्तन होणार नाही, असे यापूर्वी ठरलेले असतानाही संबंधित पथकांनी ठरलेल्या निर्णयाचे उल्लंघन केल्याचे निवेदनात म्हटले आहे. अशा पथकांवर कोणती कठोर शिस्तभंगाची कारवाई करणार, याचे स्पष्ट आणि लेखी स्पष्टीकरण महासंघाने द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.ढोल-ताशाला पर्याय देणार? कसबा गणपती मंडळाचा मोठा निर्णयया वादाच्या पार्श्वभूमीवर मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टने महत्त्वाची भूमिका जाहीर केली आहे. येत्या काही वर्षांत ढोल-ताशा वादनाला पर्याय म्हणून आपल्या संस्कृतीशी नाळ जोडलेल्या एका प्रभावी पारंपरिक वाद्यपरंपरेचा निश्चितपणे विचार करून ती प्रत्यक्षात आणणार असल्याचे ट्रस्टने म्हटले आहे. या माध्यमातून गणेशोत्सवाच्या मिरवणुकीला नवे सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देण्याचा मानसही व्यक्त करण्यात आला आहे.‘गणेशोत्सव कोणत्याही एका वाद्याची मक्तेदारी नाही’गणेशोत्सवाची परंपरा, संस्कृती आणि मिरवणुकीचे वैभव हे कोणत्याही एका वाद्याच्या, पथकाच्या किंवा संघटनेच्या मक्तेदारीत नाही. मंडळे कोणत्याही एका वाद्यप्रकारावर अवलंबून नाहीत आणि पर्याय निवडण्यास पूर्णतः सक्षम आहेत. त्यामुळे ढोल-ताशा पथकांनी स्वतःला गणेशोत्सवाचा अपरिहार्य घटक समजण्याचा गैरसमज करून घेऊ नये, अशा स्पष्ट शब्दांत निवेदनातून भूमिका मांडण्यात आली आहे.ढोल-ताशा महासंघाने आपल्या प्रसिद्धीपत्रकातील संबंधित उल्लेख मागे घेतल्याचे जाहीर केले असले, तरी केवळ दिलगिरी व्यक्त करून हा विषय संपत नाही. भविष्यात मंडळांच्या स्वायत्ततेत हस्तक्षेप केला जाणार नाही, याची स्पष्ट आणि बिनशर्त हमी महासंघाने द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.गणेशोत्सव मंडळे कोणत्याही महासंघाच्या किंवा समितीच्या अधीन नाहीत. उत्सवाचे स्वरूप आणि सहभागी पथकांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मंडळांचाच आहे. या अधिकारात कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

