पुणे महापालिकेच्या शौचालय स्वच्छता टेंडरमध्येही 100 कोटींचा घोटाळा:आरोप

Date:

माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांचे आयुक्त नवल किशोर राम यांना पत्र; प्रक्रिया तातडीने स्थगित करून चौकशीची मागणी

पुणे : पुणे महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालयांअंतर्गत सार्वजनिक तसेच वस्ती पातळीवरील शौचालय आणि मुताऱ्यांची तीन शिफ्टमध्ये दैनंदिन स्वच्छता करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या निविदा प्रक्रियेत मोठ्या आर्थिक अनियमितता असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पुणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना याबाबत सविस्तर पत्र दिले आहे.

या निविदा प्रक्रियेला तातडीने स्थगिती देऊन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

पत्रात करण्यात आलेल्या दाव्यानुसार, पुणे महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांत एकूण 1,204 सार्वजनिक शौचालये असून त्यामध्ये 15,107 सीट्स आहेत. प्रत्येक सीटच्या दैनंदिन स्वच्छतेसाठी 85 रुपये खर्च गृहीत धरण्यात आला असून त्यानुसार प्रतिदिन सुमारे 12 लाख 84 हजार रुपये खर्च अपेक्षित असल्याचे पत्रात म्हटले आहे.

मात्र, प्रत्येक सीटसाठी 85 रुपयांचा दर कोणत्या आधारावर निश्चित करण्यात आला, असा प्रश्न माजी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे 85 रुपयांपेक्षा कमी दराची निविदा भरल्यास संबंधित ठेकेदार अपात्र ठरण्याची अट असल्याचा दावाही पत्रात करण्यात आला आहे.

झोन क्रमांक 1 मधील आकडेवारीवर प्रश्न

पत्रानुसार, नगर रोड-ढोले पाटील आणि येरवडा क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश असलेल्या झोन क्रमांक 1 मध्ये 3,124 सीट्स आहेत. 85 रुपये प्रतिदिन या दराने वर्षभराचा खर्च सुमारे 9 कोटी 69 लाख रुपये होतो.

मात्र, या झोनसाठी सुमारे 23 कोटी 91 लाख रुपयांची निविदा काढण्यात आल्याचा दावा करत जवळपास 14 कोटी रुपयांच्या फरकाचा हिशेब स्पष्ट होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कसबा-विश्रामबाग, बिबवेवाडी, भवानी पेठच्या निविदेवरही आक्षेप

झोन क्रमांक 5 मध्ये कसबा-विश्रामबाग, बिबवेवाडी आणि भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश आहे. येथे 2,945 सीट्स असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

या झोनसाठीही प्रत्यक्ष गणना आणि निविदेतील रकमेध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या झोनची निविदा सुमारे 22 कोटी 28 लाख रुपयांची असल्याचे पत्रात म्हटले असून कोट्यवधी रुपयांची अतिरिक्त तरतूद कशी करण्यात आली, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

‘बजेटमध्ये हेड नाही, तरी 100 कोटींची निविदा कशी?’

या कामासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद अथवा संबंधित लेखाशीर्ष उपलब्ध नसल्याचा दावाही पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे आवश्यक निधीची तरतूद न करता एवढ्या मोठ्या रकमेची निविदा प्रक्रिया कशी सुरू करण्यात आली, असा प्रश्न माजी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

महापालिकेचे कर्मचारी सध्या ही कामे करत असतील तर त्यांची संख्या किती आणि निविदेनंतर त्यांना कोणती पर्यायी कामे देण्यात येणार आहेत, याबाबतही स्पष्टता नसल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

‘निविदा प्रक्रियेत रिंग आणि सेटलमेंटचा प्रयत्न’

पत्रामध्ये निविदा प्रक्रियेत काही ठेकेदारांकडून कथितरित्या ‘रिंग’ करण्याचा प्रयत्न झाल्याचा तसेच पात्र-अपात्र करण्याच्या प्रक्रियेबाबतही संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, या सर्व बाबी पत्रातील आरोप असून त्यांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही.

माजी पदाधिकाऱ्यांनी इंदूरमधील सार्वजनिक स्वच्छता व्यवस्थेचा अभ्यास करण्याची सूचना आयुक्तांना केली आहे. संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना इंदूरला पाठवून तेथील पद्धतीचा अभ्यास करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मुख्यमंत्री आणि मंत्र्यांकडेही तक्रार देणार

या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यापर्यंत पोहोचवणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

100 कोटी रुपये ही छोटी रक्कम नाही. हा पैसा पुणेकरांच्या करातून जमा झालेला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया तातडीने थांबवून चौकशी करण्यात यावी,” अशी मागणी उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे पदवीधर व पुणे शिक्षक मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबरला मतदान

२९ सप्टेंबरला अधिसूचना; ६ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता...

लिंग समानतेसाठी कालबद्ध कृती आराखडा राबवा

प्रत्येक मंत्रालय, प्रशासकीय विभाग आणि जिल्ह्यात नोडल अधिकारी नियुक्त...

72 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा : अनंत नाग यांना दादासाहेब फाळके; ममूटी-कार्तिक सर्वोत्कृष्ट अभिनेता

‘आर्टिकल 370’ सर्वोत्कृष्ट चित्रपट; यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, ‘घरात...

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची व्याप्ती आता देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटक स्थळांपर्यंत

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सर्व राज्यांना पुढील राष्ट्रीय...