जुन्या टर्मिनलला एकच परवानगी बाकी
पुणे (प्रतिनिधी) : पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मिनल इमारतीचे (Old Terminal Building) नूतनीकरण करून उभारण्यात आलेल्या विस्तारित चेक-इन आणि सिक्युरिटी होल्ड एरियाची केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री श्री. मुरलीधर मोहोळ यांनी पाहणी केली. प्रवाशांची वाढती संख्या, पीक अवर्समधील गर्दी आणि प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन या जुन्या टर्मिनलचे अत्याधुनिक सुविधांसह नूतनीकरण करण्यात आले असून, आवश्यक प्रक्रियांपैकी बहुतांश प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. आता केवळ BCAS अर्थात ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीची अंतिम परवानगी बाकी असून, ती मिळाल्यानंतर हे नवे विस्तारित टर्मिनल क्षेत्र लवकरच पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, “पुणे विमानतळावर प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देतानाच पीक अवर्समधील गर्दी कमी करणे ही आमची प्राथमिकता आहे. जुन्या टर्मिनल इमारतीचे नूतनीकरण करून त्याचा अधिक प्रभावी वापर करण्याचे काम पूर्ण झाले आहे. आवश्यक प्रक्रियांपैकी बहुतांश प्रक्रिया पूर्ण झाल्या असून, आता केवळ BCASची अंतिम परवानगी लवकरच मिळणार असून तशा सूचनाही BCAS ला दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच जुने टर्मिनल नव्या आणि अत्याधुनिक स्वरूपात पुणेकरांच्या सेवेत दाखल होईल.”
नूतनीकरण करण्यात आलेल्या या सुविधेचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ४,०७५ चौरस मीटर असून, त्यामध्ये चेक-इन, प्री-एम्बार्केशन सिक्युरिटी चेक (PESC) आणि सिक्युरिटी होल्ड एरिया (SHA) यांचा समावेश आहे. विस्तारित चेक-इन क्षेत्रात १४ CUTE-सक्षम चेक-इन काऊंटर उभारण्यात आले आहेत. तसेच चेक-इन क्षेत्रात २ XBIS मशिन्स आणि १ रँडम XBIS मशिन, तर PESC क्षेत्रात ४ XBIS मशिन्स आणि ८ DFMDs उपलब्ध करून देण्यात आले आहेत. बोर्डिंगसाठी 6A आणि 6B अशी दोन बोर्डिंग गेट्स तयार करण्यात आली आहेत.
प्रवाशांच्या सुविधांचा विचार करून या नूतनीकरणात व्यावसायिक सुविधांनाही स्थान देण्यात आले आहे. रिटेल आऊटलेट्ससाठी एकूण ६६.४० चौरस मीटर, तर फूड अँड बेव्हरेज आऊटलेट्ससाठी ७०.१३ चौरस मीटर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या पालकांसाठी डायपर चेंजिंग स्टेशन, वॉशरूम तसेच गरम आणि थंड पाण्याची सुविधा असलेली स्वतंत्र बेबी केअर रूम तयार करण्यात आली आहे. प्रवाशांसाठी पॉवर सॉकेट्सची सुविधा असलेल्या तीन आसनी खुर्च्यांची संख्याही वाढविण्यात आली आहे. या सुविधेमध्ये Digi Yatra ची सुविधा प्री-SHA क्षेत्र तसेच बोर्डिंग गेट्सवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या या सुविधेसाठी BCASच्या परवानगीची प्रतीक्षा आहे.
नूतनीकरणाच्या या सुविधेमुळे पुणे विमानतळाची प्रवासी हाताळणी क्षमता सुमारे ४०५ प्रवासी प्रति तासाने वाढणार आहे. त्यामुळे विशेषतः गर्दीच्या वेळेत प्रवाशांची हालचाल अधिक सुरळीत होऊन चेक-इन आणि सिक्युरिटी प्रक्रियेदरम्यान होणारी गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.
या प्रकल्पाच्या कार्यान्वयनाच्या दृष्टीने राज्य अग्निशमन विभागाकडून ९ मे २०२६ रोजी Fire NOC देण्यात आले आहे. त्यानंतर २२ जुलै २०२६ रोजी ORAT (Operational Readiness and Airport Transfer) सराव पूर्ण करण्यात आला. तसेच ३० आणि ३१ जुलै २०२६ रोजी अंतिम सुरक्षा तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे आता आवश्यक असलेली BCASची अंतिम मंजुरी मिळणे बाकी आहे.
पुणे विमानतळावरील वाढती प्रवासी संख्या आणि भविष्यातील गरजा लक्षात घेता उपलब्ध पायाभूत सुविधांचा अधिकाधिक प्रभावी वापर करून प्रवाशांना आधुनिक, सुरक्षित आणि सुलभ सेवा देण्याच्या दृष्टीने हे नूतनीकरण महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

