दहीहंडीत ध्वनिप्रदूषण नियमभंगाच्या 116 प्रकरणांत कारवाई; प्लाझ्मा-प्रेशर साऊंडवर बंदी, ‘चार बेस-चार टॉप’ची मर्यादा कायम
पुणे : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनिप्रदूषणाचे नियम मोडणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचा स्पष्ट इशारा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. दहीहंडी उत्सवात बहुतांश नागरिक आणि मंडळांनी स्वयंस्फूर्तीने नियमांचे पालन केले; मात्र नियमभंग करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली असून 116 प्रकरणे नोंदवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अमितेश कुमार यांनी पुणेकरांचे दहीहंडी उत्सव शांततेत आणि नियमांचे पालन करून साजरा केल्याबद्दल आभार मानले. बहुतांश मंडळांकडून स्वयंस्फूर्तीने नियमपालन करण्यात आले. मात्र काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याने पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईचा उद्देश केवळ गुन्हे दाखल करणे नसून भविष्यात नियमभंग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक संदेश देणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्लाझ्मा, प्रेशर साऊंडला पूर्ण बंदी
सण-उत्सवांमध्ये प्लाझ्मा स्पीकर आणि प्रेशर-मिड साऊंड सिस्टीमच्या वापरावर पूर्ण बंदी आहे. मंडळांना ‘चार बेस आणि चार टॉप’ या मर्यादेत साऊंड सिस्टीम वापरण्याची परवानगी असली तरी निर्धारित डेसिबल मर्यादेचे पालन करणे आवश्यक असल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले. नियमांचे उल्लंघन आढळल्यास तत्काळ कारवाई केली जाईल.
अमितेश कुमार यांनी सांगितले की, दहीहंडीमध्ये दिसून आलेल्या स्वयंस्फूर्त नियमपालनामुळे आगामी गणेशोत्सवातही डीजे आणि ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन कमी होईल, अशी पोलिसांना अपेक्षा आहे. पोलीस कारवाई आणि नागरिक-मंडळांच्या सहकार्यामुळे यंदाचा गणेशोत्सव मागील वर्षांच्या तुलनेत वेगळा दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
गर्दीचे नियोजनही पोलिसांच्या अजेंड्यावर
गणेशोत्सवात पुण्यात देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे गर्दी नियंत्रण आणि संभाव्य चेंगराचेंगरीसारख्या परिस्थिती टाळण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येत असल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले. भाविकांना त्रास होऊ नये आणि उत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

