पंतप्रधानांच्या हस्ते वडोदरा इथल्या 35,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण होणार
पंतप्रधानांच्या हस्ते पश्चिम विभागीय समर्पित मालवाहू कॉरिडॉरच्या (WDFC) तीन महत्त्वाच्या टप्प्यांचे राष्ट्रार्पण होणार यामुळे हा संपूर्ण प्रकल्प पूर्णत्वाला जाणार
पंतप्रधानांच्या हस्ते होणार तीन रेल्वे प्रकल्प आणि तीन महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी
मुंबईत आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 (GFF) या महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार
पोटेंशियल टू इम्पॅक्ट: एजंटिक एआय, टोकेनायझेशन, क्वांटम – ट्रस्टेड, कनेक्टेड, ग्लोबल सिस्टिम्स फॉर इन्क्लुसिव्ह फायनान्स ही ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 या महोत्सवाची संकल्पना
मुंबई-
पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 सप्टेंबर 2026 रोजी गुजरात आणि महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. आपल्या या दौऱ्यात ते दुपारी सुमारे 12 वाजता, वडोदरा इथे 35,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण करतील. यावेळी ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.
संध्याकाळी सुमारे 5:45 वाजता, पंतप्रधान मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 चे (GFF – Global Fintech Fest) अर्थात जागतिक वित्तीय तंत्रज्ञान महोत्सवाचे उद्घाटन करतील, यावेळीही ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.
पंतप्रधानांचा वडोदरा दौरा
आपल्या वडोदरा दौऱ्यात पंतप्रधान पश्चिम विभागीय समर्पित मालवाहू कॉरिडॉर (WDFC – Western Dedicated Freight Corridor) अंतर्गत 326 मार्ग किलोमीटर व्याप्तीच्या आणि 20,700 कोटी रुपायंपेक्षा जास्त खर्च करून उभारलेल्या तीन महत्त्वाच्या टप्प्यांचे राष्ट्रार्पण करतील. यात साणंद (उत्तर)-मकरपुरा, न्यू उंबरगाव-न्यू सफाळे आणि न्यू सफाळे-जेएनपीटी या टप्प्यांचा समावेश आहे.
या प्रकल्पामुळे जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणासोबतची थेट दळणवळणीय जोडणी उपलब्ध होणार आहे. परिणामी आयात-निर्याती (EXIM) संदर्भात होणारी मालवाहतूक जलद गतीने होण्यास मदत होईल, औद्योगिक केंद्रे आणि बंदरांसोबतची दळणवळणीय जोडणी अधिक भक्कम होईल, रसद पुरवठा व्यवस्थापनासाठीचा (logistics) खर्च कमी होईल आणि मुंबईतील रेल्वे व्यवस्थेवरचा ताण कमी होण्यासही मदत होणार आहे.
या टप्प्यांचे राष्ट्रार्पण केल्यानंतर, या समर्पित मालवाहू कॉरिडॉरशी (DFC – Dedicated Freight Corridor) संलग्न संपूर्ण जाळे कार्यरत होईल. या समर्पित मालवाहू पायाभूत व्यवस्थेमुळे बहु पर्यायी (multimodal) दळणवळणीय जोडणीत सुधारणा घडून येईल, वाहतुकीचा वेळ कमी होईल तसेच विविध प्रदेशांमध्ये वस्तुमालाची वाहतूक विनाअडथळा आणि सुलभतेने करणे शक्य होईल, परिणामी देशाच्या रसद पुरवठा व्यवस्थापनाच्या परिसंस्थेलाही यामुळे अधिक बळकटी मिळेल.
आपल्या या दौऱ्यात पंतप्रधान न्यू साणंद (उत्तर), न्यू मकरपुरा, न्यू उंबरगाव आणि न्यू जेएनपीटी, मुंबई इथून निघणाऱ्या मालगाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवानाही करणार आहेत. यासोबतच ते वडोदरा आणि टांडा रोड दरम्यानच्या एका नवीन रेल्वे गाडी सेवेचा प्रारंभही करणार आहेत. या रेल्वेगाडीच्या सेवाचा लाभ हा प्रामुख्याने वडोदरा, छोटा उदेपूर आणि अलिराजपूर जिल्ह्यांतील नागरिकांना होणार आहेत.
छोटा उदेपूर-धार प्रकल्पाचा एक भाग म्हणून विकसित केलेल्या जोबट – टांडा रोड या नवीन रेल्वे मार्गाचे राष्ट्रार्पणही पंतप्रधान करणार आहेत. हा नवीन रेल्वे मार्गामुळे अलिराजपूरचे दुर्गम आणि आदिवासी भाग राष्ट्रीय रेल्वे सेवेच्या मुख्य व्यवस्थेशी जोडला जाणार आहे.
पंतप्रधान 329 किलोमीटर लांबीच्या आणि 9,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या तीन रेल्वे प्रकल्पांचे भूमिपूजन करतील. यामध्ये वडोदरा-रतलाम तिसरी आणि चौथी रेल्वे लाईन, मियागम कर्जन-चोरंडा-मालसर गेजचे रूपांतरण आणि विश्वामित्री-दाभोई दुहेरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे प्रवासी आणि मालवाहतूक क्षमता वाढेल, वाहतूक कोंडी कमी होईल आणि गुजरात व मध्य प्रदेश दरम्यानची कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होईल.
पंतप्रधान सुमारे 1,780 कोटी रुपये खर्चाच्या तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन करतील. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग 48 क्रमांकाच्या कामरेज-चलथान विभागाचे सहापदरीकरण; राष्ट्रीय महामार्ग 48 क्रमांकाच्या वडोदरा-सुरत विभागावर तापी आणि नर्मदा नद्यांवरील प्रमुख पुलांसह अतिरिक्त संरचनांचे बांधकाम; आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील अभावा, मिंधोला आणि खजोड जंक्शनवर ग्रेड-सेपरेटेड संरचना यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, पंतप्रधान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 च्या वडोदरा-सुरत विभागातील रस्ते सुरक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी आणि अपघातप्रवण क्षेत्रांची समस्या दूर करण्यासाठी कंदारी चौकडी आणि लुवारा पाटिया येथील सहा पदरी उड्डाणपुलांचे उद्घाटन करतील.
पंतप्रधान गुजरात सरकारच्या सुमारे 2,600 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटनही करतील. ज्या प्रमुख प्रकल्पांचे भूमिपूजन केले जाईल, त्यांमध्ये वडोदरा शहरी विकास प्राधिकरण रिंग रोडचा दुसरा टप्पा, कडणा धरणावरील 110 मेगावॅटचा तरंगता सौर प्रकल्प, वडोदरा महानगरपालिकेच्या नवीन कार्यालयाचे बांधकाम यांचा समावेश आहे. उद्घाटन होणाऱ्या प्रकल्पांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY) गृहनिर्माण प्रकल्प आणि पूर्व वडोदरामधील 11 गावांच्या पाणीपुरवठा प्रकल्पांचाही समावेश आहे.
पंतप्रधानांचा मुंबई दौरा
या दरम्यान पंतप्रधान जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात प्रभावशाली वार्षिक फिनटेक परिषदांपैकी एक असलेल्या ग्लोबल फिनटेक फेस्ट (GFF) 2026 चे उद्घाटन करतील.
सातवी ग्लोबल फिनटेक फेस्ट ही परीषद 8 ते 11 सप्टेंबर 2026 दरम्यान मुंबईत आयोजित केली जात आहे. 2020 पासून, जीएफएफ (GFF) हे एक आंतरराष्ट्रीय विचार-नेतृत्व व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे, जे वित्त क्षेत्राचे भविष्य घडवण्यावर विचारविनिमय करण्यासाठी धोरणकर्ते, नियामक मंडळे, मध्यवर्ती बँका, वित्तीय संस्था, फिनटेक कंपन्या, तंत्रज्ञान कंपन्या, गुंतवणूकदार, शिक्षण क्षेत्र आणि इतर जागतिक भागधारकांना एकत्र आणते.
“प्रभाव पाडण्याची क्षमता: एजेंटिक एआय, टोकेनायझेशन, क्वांटम – सर्वसमावेशक वित्तासाठी विश्वसनीय, जोडलेल्या, जागतिक प्रणाली” ही जीएफएफ 2026 ची संकल्पना आहे
जीएफएफ 2026 ची रचना: धोरण, नियमन, तंत्रज्ञान, भांडवल आणि उद्योग यांना एका समान व्यासपीठावर एकत्र आणणारे केंद्र म्हणून करण्यात आली आहे. डिजिटल पेमेंट आणि आर्थिक समावेशनामध्ये भारताचे नेतृत्व अधिक मजबूत करणे आणि संभाव्यतेकडून परिणामाकडे वाटचाल करणे, हे याचे उद्दिष्ट आहे. एजेंटिक एआय, प्रोग्रामेबल फायनान्स, क्वांटम तंत्रज्ञान आणि इतर महत्त्वपूर्ण व उदयोन्मुख तंत्रज्ञान जागतिक स्तरावर नागरिक, उद्योग आणि अर्थव्यवस्थांसाठी कशाप्रकारे विश्वासार्ह, सर्वसमावेशक आणि मोजता येण्याजोगे परिणाम निर्माण करू शकतात, यावर यातील चर्चासत्रे केंद्रित असेल.

