जुनी सांगवीतील घटना; कार्यक्रम संपल्यानंतर कमान उतरवताना अपघात, सांगवी पोलिसांकडून तपास सुरू
पुणे : दहीहंडी उत्सवासाठी उभारलेल्या स्टेजची लोखंडी कमान अंगावर पडल्याने ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील जुनी सांगवी परिसरात घडली. सलमा सलाउद्दीन पठाण (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना ४ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास जुनी सांगवीतील लेन क्रमांक दोन येथे घडली.
सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनी सांगवीतील विघ्नहर्ता दहीहंडी मित्र मंडळाने दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. रात्री दहा वाजून पाच मिनिटांनी दहीहंडी फोडण्यात आली. कार्यक्रम संपल्यानंतर स्टेज आणि त्यासाठी उभारण्यात आलेला लोखंडी सांगाडा उतरवण्याचे काम सुरू करण्यात आले होते.
सलमा पठाण या पती सलाउद्दीन पठाण यांच्यासोबत कार्यक्रम पाहण्यासाठी आल्या होत्या. कार्यक्रम संपल्यानंतर पतीने त्यांना घरी जाण्यासाठी बोलावले. त्या पतीच्या दिशेने जात असतानाच स्टेजची लोखंडी कमान उतरवण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी कमानीचा लोखंडी अँगल अचानक त्यांच्या अंगावर पडला. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या.
उपस्थित नागरिक आणि नातेवाइकांनी त्यांना तातडीने औंध येथील रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर उत्सवस्थळी मोठा गोंधळ उडाला.
दरम्यान, मृत महिलेचा मुलगा संबंधित दहीहंडी मंडळाचा कार्यकर्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे सलमा यांचे पती, मुलगा आणि अन्य नातेवाईकांनी मंडळाविरोधात तक्रार देण्यास नकार दिल्याचे सांगण्यात आले. मंडळातील इतर तरुण अडचणीत येऊ नयेत, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कमान उतरवताना आवश्यक सुरक्षेची खबरदारी घेण्यात आली होती का आणि घटनेमागे कोणाचा निष्काळजीपणा आहे का, याचा तपास सुरू आहे. तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी दिली.

