चाकण परिसरातील अतिक्रमण कार्यवाहीला सुरुवात; पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी करणार पाहणी

Date:

वेळेत कामे पूर्ण न करणाऱ्या संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश

पुणे : चाकण एमआयडीसी परिसरातील रस्ते दुरुस्ती, वाहतूक कोंडी निवारण, वाहनतळ व्यवस्था, अतिक्रमण निर्मूलन आणि पावसाच्या पाण्याचा निचरा याबाबत तातडीने ठोस उपाययोजना करून कामांना गती द्यावी. निर्धारित वेळेत कामे पूर्ण न करणाऱ्या संबंधित यंत्रणा व कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करून आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

चाकण परिसरातील रस्ते व वाहतूक व्यवस्थेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत विविध शासकीय यंत्रणा, औद्योगिक संघटना, चाकण ट्रक असोसिएशनचे प्रतिनिधी तसेच स्थानिक नागरिकांकडून मांडण्यात आलेल्या प्रश्नांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीस आमदार बाबाजी काळे, अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, पिंपरी-चिंचवड पोलीस वाहतूक विभागाचे उपायुक्त विक्रांत देशमुख तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

चाकण औद्योगिक परिसरात मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने निर्माण होणारी वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, वाहनतळाची कमतरता, पावसाचे पाणी साचणे, अतिक्रमणे आणि विविध ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा बैठकीत आढावा घेण्यात आला. या सर्व प्रश्नांवर तातडीच्या तसेच दीर्घकालीन उपाययोजनांचा समन्वयाने आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

रस्त्यावर अवजड वाहने उभी करण्यास प्रतिबंध
चाकण एमआयडीसी परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी उपलब्ध मोकळ्या जागांचा योग्य वापर करून स्वतंत्र वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे. महिंद्रा गेटजवळ, सैनी मर्सिडीजजवळ, एच.पी. चौक, हंटमन चौक तसेच भंडारा डोंगर पायथ्याशी उपलब्ध जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

एमआयडीसी परिसरातील अवजड वाहने निश्चित केलेल्या पार्किंगच्या जागेतच उभी करावीत. रस्त्यांवर वाहने उभी राहणार नाहीत, याची दक्षता चाकण ट्रक असोसिएशनने घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डुडी यांनी दिले. भंडारा डोंगर पायथ्याशी उपलब्ध जागेचा तात्पुरत्या स्वरूपात पार्किंगसाठी वापर करण्यात येणार असून तेथे कोणतेही पक्के बांधकाम केले जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.

अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी प्रभावी कार्यवाही करावी. उपलब्ध पार्किंगच्या जागांचा नियमित आढावा घेऊन त्यांचा योग्य वापर होत आहे की नाही, याची खात्री करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

५०० किलोमीटर अंतर्गत रस्त्यांचे नियोजन
चाकण एमआयडीसी परिसरातील सुमारे ५०० किलोमीटर अंतर्गत रस्त्यांच्या नियोजनाची प्रक्रिया सुरू आहे. वाहतूक कोंडीची ठिकाणे, औद्योगिक वाहतुकीचा अधिक ताण असलेले मार्ग आणि तातडीने दुरुस्तीची आवश्यकता असलेल्या रस्त्यांना यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे.

रस्ते दुरुस्ती केवळ खड्डे बुजविण्यापुरती मर्यादित न ठेवता आवश्यकतेनुसार संरचनात्मक दुरुस्ती करावी. त्याचबरोबर रस्त्यांची स्वच्छता, पावसाच्या पाण्याचा निचरा आणि पाणी साचणाऱ्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डुडी यांनी दिले.

संथ गतीने सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करा
एमआयडीसी, पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआयडीसी तसेच इतर संबंधित यंत्रणांकडून सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. संथ गतीने सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत. निर्धारित कालमर्यादेत कामे पूर्ण न करणाऱ्या संबंधितांची जबाबदारी निश्चित करून आवश्यक कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डुडी यांनी दिले.

रस्त्यांची कामे सुरू असताना वाहतूक विस्कळीत होणार नाही, याची दक्षता घेण्यासही सांगण्यात आले. कामाच्या ठिकाणी योग्य बॅरिकेडिंग, वाहतूक वळविण्याची व्यवस्था आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अपूर्ण कामे, रस्त्यावरील अडथळे किंवा अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेमुळे अपघात होणार नाहीत, याची संबंधित कंत्राटदार आणि यंत्रणांनी विशेष दक्षता घ्यावी. सुरक्षा नियमांचे उल्लंघन अथवा निष्काळजीपणामुळे अपघात झाल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून कार्यवाही करण्यात यावी, असेही निर्देश देण्यात आले.

अतिक्रमण कार्यवाहीला गती
चाकण परिसरातील रस्ते आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही थांबली आहे, ती तातडीने पुन्हा सुरू करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले.

या कार्यवाहीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पुढील आठवड्यात चाकण परिसराची पाहणी करणार आहेत. यावेळी संबंधित विभागांनी केलेल्या कार्यवाहीचा तसेच प्रलंबित अतिक्रमणांवरील कारवाईचा प्रत्यक्ष आढावा घेतला जाणार आहे.

पावसाच्या पाण्याचा कायमस्वरूपी निचरा
चाकण एमआयडीसी परिसरातील काही रस्त्यांवर पावसाचे पाणी साचत असल्याच्या तक्रारींचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. पाणी साचण्याची कारणे निश्चित करून नाले, ड्रेनेज व्यवस्था आणि रस्त्यांची उंची यांचा तांत्रिक आढावा घ्यावा. वारंवार पाणी साचणाऱ्या ठिकाणी तात्पुरत्या उपायांऐवजी कायमस्वरूपी निचरा व्यवस्था उभारावी, अशा सूचना देण्यात आल्या.

भोसरी, आकुर्डी मार्गावरील वाहतुकीचाही विचार
चाकण परिसरातील वाहतुकीचा परिणाम भोसरी, आकुर्डी तसेच पुणे शहराच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवरही होत असल्याने व्यापक वाहतूक नियोजन करताना या मार्गांचाही विचार करावा, असे निर्देश देण्यात आले. आवश्यक ठिकाणी पीएमपीएमएल बसथांबे आणि बस वाहतुकीच्या व्यवस्थेचाही आढावा घेण्यास सांगण्यात आले.

वाहतूक कोंडीची प्रमुख ठिकाणे निश्चित करून तेथे तातडीच्या उपाययोजना कराव्यात. आवश्यकतेनुसार वाहतूक नियमन, सिग्नल व्यवस्था, पार्किंग नियंत्रण आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीचे नियोजन करण्याबरोबरच भविष्यातील औद्योगिक व नागरी वाहतूक वाढीचा विचार करून दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, असेही डुडी यांनी सांगितले.

दर शुक्रवारी कामांचा आढावा
चाकण परिसरातील रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेच्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी दर शुक्रवारी बैठक घेण्यात येणार आहे. संबंधित विभागांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा. प्रलंबित कामांची कारणे तसेच ती पूर्ण करण्याची निश्चित कालमर्यादा पुढील बैठकीत स्पष्ट करावी, असे निर्देश देण्यात आले.

चाकणसारख्या मोठ्या औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक सुरळीत राहणे हे उद्योगांची कार्यक्षमता तसेच नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे रस्ते, पार्किंग, वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि पावसाच्या पाण्याचा निचरा या सर्व प्रश्नांवर संबंधित विभागांनी समन्वयाने आणि वेळबद्ध पद्धतीने कार्यवाही करून त्याचा परिणाम प्रत्यक्ष दिसला पाहिजे, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हिंजवडी परिसरातील समस्या सोडविण्यासाठी हाय पॉवर कमिटीची पहिली बैठक संपन्न

हिंजवडी आयटी पार्क परिसरातील अंतर्गत रस्त्यांसाठी ४२६ कोटींचा निधी...