‘बापटांची मराठी ट्रेंडिंग; शब्द समजून घेण्यासाठी मला ट्युशन घ्यावी लागेल!’ — देवेंद्र फडणवीस

Date:

बापटांवरील हल्ल्याचा मुख्यमंत्र्यांकडून निषेध; पुण्यातील डीजेच्या प्रचंड ‘बेस’ला आळा घालण्यासाठी मंडळांशी चर्चेतून मार्ग काढणार

पुणे : पुण्यातील डीजे वाद आणि बापट यांच्यावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा आपली भूमिका मांडली. बापट यांच्यावर झालेला हल्ला निषेधार्ह असल्याचे सांगतानाच त्यांच्या शुद्ध आणि संस्कृतप्रचुर मराठीचे फडणवीस यांनी कौतुक केले. “सध्या बापटांची मराठी सोशल मीडियावर चांगलीच ट्रेंडिंग आहे. ते वापरत असलेले काही शब्द समजून घेण्यासाठी मलाच त्यांच्याकडून ट्युशन घ्यावी लागेल,” अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली.

पुणे दौऱ्यादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी पुण्यातील डीजे आणि ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न, बापट यांच्यावरील हल्ला, राज्यासाठी प्रस्तावित डीजे धोरण तसेच पुणे-मुंबईतील फिनटेक गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीबाबत भाष्य केले.

‘मत मांडणाऱ्यावर हिंसा करणे योग्य नाही’

बापट यांच्यावरील हल्ल्याबाबत फडणवीस म्हणाले, “बापट यांच्यावर झालेला हल्ला निषेधार्ह आहे. लोकशाहीमध्ये मतभेद असू शकतात, वेगवेगळे विचारप्रवाह असू शकतात; मात्र एखाद्याने आपले मत मांडले म्हणून त्याच्यावर हिंसा करणे अजिबात योग्य नाही.”

‘भूकंपासारखा प्रचंड बेस थांबवण्यावर एकमत’

पुण्यातील डीजे आणि ध्वनिप्रदूषणाच्या प्रश्नावर ते म्हणाले, “केवळ कायद्याचा बडगा उगारून कोणतीही प्रथा बंद होत नाही. लोकांना विश्वासात घेऊन त्यातून मार्ग काढावा लागतो. पुणे पोलीस आयुक्तांशी माझी चर्चा झाली आहे. भूकंप आल्यासारखा जो प्रचंड आवाज, विशेषतः बेस निर्माण होतो, तो थांबवण्याबाबत बहुतांश मंडळांचे एकमत झाले आहे.”

नागरिक आणि गणेश मंडळांच्या सहभागातून डीजेचे स्तोम कमी केले जाईल आणि उत्सव शांततेत तसेच पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यव्यापी डीजे धोरण टप्प्याटप्प्याने

राज्यासाठी एकसंध डीजे धोरण तयार करण्याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, “धोरण एका रात्रीत तयार होत नाही. ज्या-ज्या ठिकाणी चर्चा झाली आहे, तिथे ९० ते ९५ टक्के लोक सहकार्य करण्यास तयार झाले आहेत. सर्वांशी चर्चा करून एकमत निर्माण झाल्यानंतर संपूर्ण राज्यासाठी आवश्यक आदेश काढले जातील.”

‘बापटांची शुद्ध मराठी ऐकून आनंद होतो’

बापट यांच्या प्रमाण आणि संस्कृतप्रचुर मराठीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर फडणवीस यांनी हसतमुखाने प्रतिक्रिया दिली.

“सध्या बापटांची मराठी सोशल मीडियावर चांगलीच ट्रेंडिंग आहे. त्यांच्या बोलण्यातून अस्खलित आणि शुद्ध मराठीचा सुंदर नमुना पाहायला मिळतो. केवळ बापटच नाही, तर कोणीही अशी समृद्ध भाषा बोलत असेल तर ती ऐकून मनाला आनंद होतो,” असे त्यांनी सांगितले.

मात्र आपले विचार मांडताना इतरांनाही सामावून घेणारी भूमिका असावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

“ते जशी सुंदर भाषा वापरतात, तशीच आपले विचार मांडताना इतरांना त्रास होणार नाही अशा ‘अकोमोडेटिव्ह’ म्हणजे सर्वसमावेशक पद्धतीने मांडणी करावी. आता ‘अकोमोडेटिव्ह’ या शब्दासाठी त्यांनी नेमका कोणता शुद्ध मराठी शब्द वापरला असता, हे समजून घेण्यासाठी मला त्यांच्याकडून ट्युशनच घ्यावी लागेल,” असे फडणवीस म्हणाले.

मुंबई-पुण्याने फिनटेकमध्ये बेंगळुरूला मागे टाकले

राज्यातील गुंतवणुकीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, आर्थिक आणि फिनटेक क्षेत्रात महाराष्ट्राने पुन्हा आघाडी घेतली असून चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मुंबई आणि पुण्याने मिळून बेंगळुरूला मागे टाकले आहे.

“देशात आलेल्या एकूण फिनटेक गुंतवणुकीपैकी तब्बल ६१ टक्के गुंतवणूक एकट्या मुंबईत झाली आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.

पुण्यात दोन मोठे प्रकल्प; ४० हजार रोजगार

पुणे दौऱ्यात फडणवीस यांच्या हस्ते मॅग्नमच्या ‘ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर’चे उद्घाटन करण्यात आले. तसेच बजाज फिनसर्व्हच्या देशातील सर्वात मोठ्या फिनटेक मुख्यालयाचे भूमिपूजनही करण्यात आले.

“जगातील १०० वर्षांहून जुनी आणि अग्रगण्य आईस्क्रीम कंपनी असलेल्या मॅग्नमने आपले अत्याधुनिक ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर पुण्यात सुरू केले आहे. या केंद्रातून कंपनीच्या जगभरातील कामकाजाचे नियंत्रण आणि व्यवस्थापन केले जाणार आहे,” असे फडणवीस यांनी सांगितले.

बजाज फिनसर्व्हच्या प्रस्तावित मुख्यालयाबाबत ते म्हणाले, “सुमारे ७२ लाख चौरस फुटांचा हा प्रकल्प पूर्णपणे पर्यावरणपूरक आणि अत्याधुनिक असेल. या एकाच कॅम्पसमधून जवळपास ४० हजार उच्चशिक्षित तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.”

‘कंपनीच्या आधी प्रशासनाने काम पूर्ण करावे’

या मुख्यालयामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढणार असल्याने रस्ता रुंदीकरण, उड्डाणपूल आणि पर्यायी पुलाची गरज असल्याचे कंपनी व्यवस्थापनाने निदर्शनास आणून दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

“कंपनी तीन वर्षांत आपली इमारत पूर्ण करणार आहे. मात्र त्यांची इमारत उभी राहण्यापूर्वी प्रशासनाने आवश्यक रस्ते आणि पूल पूर्ण करून दाखवावेत, अशी एक प्रकारची स्पर्धाच आम्ही अधिकाऱ्यांना लावून दिली आहे,” असे फडणवीस म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भारतीय पर्यटकांसाठी इंडोनेशियात ‘वाइल्ड’ सफारीचा अनुभव; तमन सफारीचे खास आमंत्रण

कोमोडो ड्रॅगन, सुमात्रन हत्ती, वाघांपासून पेंग्विनपर्यंत दुर्मिळ वन्यजीवांचे दर्शन;...

पुण्यात शिक्षकांचे धरणे आंदोलन; संचमान्यतेचा फेरआढावा घेण्याची जोरदार मागणी

अन्यायकारक संचमान्यता निकष रद्द करा; शिक्षकांच्या सेवासुरक्षेसह विद्यार्थ्यांचे शैक्षणिक...

विद्यार्थ्यांसाठी पहिल्या आंतरराष्ट्रीय स्टुडंट फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाचे आयोजन

१० सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर पर्यंत फिल्म सादरीकरणाचे आवाहन पुणे...

उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते १८ सप्टेंबर रोजी पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन

पुणे- कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत, साहित्य, क्रीडा आणि पर्यटनविकास यांचा मनोहारी संगम असणारा ‘पुणे...