कोमोडो ड्रॅगन, सुमात्रन हत्ती, वाघांपासून पेंग्विनपर्यंत दुर्मिळ वन्यजीवांचे दर्शन; भारतीय खाद्यपदार्थ आणि कौटुंबिक पॅकेजेसचीही सुविधा
मुंबई/जकार्ता : इंडोनेशियाला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत असताना, देशातील प्रमुख वन्यजीव आणि संवर्धन संस्था तमन सफारी इंडोनेशिया (TSI) ने भारतीय पर्यटकांना बाली आणि जावामधील सफारी पर्यटनाचा अनुभव घेण्यासाठी आमंत्रित केले आहे. कोमोडो ड्रॅगन, सुमात्रन हत्ती, वाघ, जायंट पांडा तसेच विविध सागरी जीवांचे जवळून दर्शन घेण्याची संधी या सफारी पार्कमध्ये उपलब्ध आहे.
तमन सफारीच्या विविध केंद्रांमध्ये नैसर्गिक अधिवासातील वन्यजीव दर्शनाबरोबरच नाईट सफारी, प्राण्यांना खाद्य देण्याचा अनुभव, ॲक्वेरियम, विविध शो आणि रिसॉर्टमध्ये मुक्काम अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इंडोनेशियाला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या २०२३ मधील ६ लाख ६ हजारांवरून २०२४ मध्ये ७ लाख १० हजारांपेक्षा अधिक झाली. २०२५ मध्ये ही संख्या सुमारे ७ लाख ३४ हजारांपर्यंत पोहोचली. दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूहून बालीसाठी उपलब्ध विमानसेवा तसेच जकार्तासाठी वाढलेली कनेक्टिव्हिटी यामुळे भारतीय पर्यटकांसाठी इंडोनेशियाचा प्रवास अधिक सुलभ झाला आहे.
सहा ठिकाणी २२ हजारांहून अधिक प्राणी
तमन सफारी इंडोनेशियाच्या नेटवर्कमध्ये ६७३ पेक्षा अधिक प्रजातींचे सुमारे २२ हजार प्राणी असल्याचे संस्थेने म्हटले आहे. बाली, बोगोर, प्रिगेन, जकार्ता, सोलो आणि बातांग या भागांमध्ये विविध प्रकारचे वन्यजीव व पर्यटन अनुभव उपलब्ध आहेत.
मरीन सफारी बाली येथे ३०० प्रजातींचे १० हजारांहून अधिक मासे आणि इतर सागरी जीव पाहता येतात. येथे हम्बोल्ट पेंग्विनसह अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्रजाती आहेत. ‘वरुणा’ या पाण्याखालील थिएटर रेस्टॉरंटमध्ये भोजनासोबत विशेष सादरीकरणाचा अनुभवही पर्यटकांना घेता येतो.
तमन सफारी बालीमध्ये इंडोनेशिया, भारत आणि आफ्रिकेतील २७५ प्रजातींचे चार हजारांहून अधिक प्राणी आहेत. सफारी जर्नी, नाईट सफारी आणि मारा रिव्हर सफारी लॉज हे येथे प्रमुख आकर्षण आहे.
बोगोरमध्ये जायंट पांडा
बोगोरमधील तमन सफारी हे ४०० प्रजातींमधील ८,७०० पेक्षा जास्त प्राण्यांचे निवासस्थान असून, जायंट पांडा काय ताओ आणि हू चुन हे येथील प्रमुख आकर्षण आहेत. येथे सफारी जर्नी, नाईट सफारी, विविध राईड्स आणि २० पेक्षा अधिक शो आयोजित केले जातात.
प्रिगेनमधील ग्रँड तमन सफारीमध्ये जिराफ फीडिंग, एटीव्ही ॲडव्हेंचर आणि सफारी वॉटर वर्ल्डसह चार तारांकित बाओबाब सफारी रिसॉर्टची सुविधा आहे.
जकार्तामध्ये पेंग्विनसोबत भोजनाचा अनुभव
जकार्ता ॲक्वेरियम अँड सफारीमध्ये १३ झोनमध्ये सुमारे ३,५०० जलचर आणि इतर प्राणी आहेत. कॅपिबारा, सील आणि पेंग्विन हे येथील प्रमुख आकर्षण आहेत. पर्यटकांना ॲक्वा ट्रेकिंग आणि पेंग्विनसोबत भोजनाचा अनुभवही घेता येतो.
सोलो सफारीमध्ये वन्यजीव पर्यटनासोबत जावानीज संस्कृतीचा अनुभव दिला जातो, तर बातांग येथील फंटास्टिक बीच सफारीमध्ये समुद्रकिनारा आणि वन्यजीव पर्यटनाचा अनोखा संगम पाहायला मिळतो.
भारतीय पर्यटकांसाठी भारतीय जेवणाची व्यवस्था
भारतीय कुटुंबांना लक्षात घेऊन तमन सफारीच्या निवडक केंद्रांमध्ये भारतीय आणि शाकाहारी भोजनाचे पर्याय उपलब्ध करून देण्यात येत आहेत. भारतीय शेफची मदत, खासगी वाहन सफारी, बहुभाषिक मार्गदर्शक आणि कुटुंबासाठी स्वतंत्र पॅकेजेसही उपलब्ध आहेत. जैन भोजनासारख्या विशेष आहाराची आवश्यकता असल्यास आगाऊ माहिती देण्याची सुविधाही आहे.
तमन सफारी इंडोनेशियाचे मुख्य विपणन अधिकारी अलेक्झांडर झुल्करनैन म्हणाले की, भारतीय पर्यटक विशेषतः कुटुंबासह प्रवास करताना वेगळ्या आणि संस्मरणीय अनुभवांना प्राधान्य देतात. “कोमोडो ड्रॅगन आणि सुमात्रन हत्ती जवळून पाहण्यापासून ते बालीतील निसर्गरम्य रिसॉर्टमध्ये मुक्काम करण्यापर्यंत अनेक वैशिष्ट्यपूर्ण अनुभव तमन सफारीमध्ये उपलब्ध आहेत,” असे त्यांनी सांगितले.
तमन सफारी भारतीय ट्रॅव्हल ऑपरेटर, वेडिंग आणि इव्हेंट आयोजक तसेच डिजिटल क्रिएटर्ससोबतही विविध सफारी आणि कौटुंबिक पर्यटन पॅकेजेस विकसित करत आहे.

