पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचा आदेश; ३ सप्टेंबर ते १ नोव्हेंबरपर्यंत अंमलबजावणी
नागपूर : आगामी गणेशोत्सव तसेच विविध धार्मिक आणि सामाजिक उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात मिरवणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मोठ्या आवाजाच्या मल्टीलेयर डॉल्बी साऊंड सिस्टिमवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ अंतर्गत यासंदर्भातील आदेश जारी केला आहे.
हा आदेश ३ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते १ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत लागू राहणार आहे.
पोलिसांच्या आदेशानुसार, टॉप, मिड आणि बेस अशा विविध स्पीकर्सचे अनेक थर लावून तयार करण्यात येणाऱ्या मल्टीस्पीकर सिस्टिम, प्लाझमा साऊंड सिस्टिम आणि प्रेशरमिड साऊंड सिस्टिमवर विशेष निर्बंध राहणार आहेत. मोठ्या वाहनांवर स्पीकर्सचे थर लावून भिंतीसारखी रचना तयार करणे आणि त्यासाठी वाहनांमध्ये बदल करणे अशा प्रकारांवरही पोलिसांचे लक्ष राहणार आहे.
गोकुळाष्टमी, दहीहंडी, पोळा, तान्हा पोळा, ताजुद्दीन बाबा छब्बीसवी, गणेशोत्सव, गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जन मिरवणुका, धम्मचक्र प्रवर्तन दिन तसेच दुर्गादेवी मूर्ती आगमन व विसर्जनाच्या काळात मोठ्या साऊंड सिस्टिमचा वापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
साऊंड सिस्टिमसह वाहने सीलबंद करण्याचे आदेश
बंदीच्या कक्षेत येणाऱ्या मल्टीलेयर साऊंड सिस्टिमसाठी तयार करण्यात आलेली वाहने आणि त्यातील साऊंड सिस्टिम ज्या ठिकाणी आहेत, त्याच ठिकाणी सीलबंद करून ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याची जबाबदारी संबंधित साऊंड सिस्टिमचे मालक, धारक, उत्सव आयोजक आणि मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर राहणार आहे.
मोठ्या आवाजातील डॉल्बी साऊंड सिस्टिममुळे निर्धारित ध्वनीमर्यादेचे उल्लंघन होण्याची शक्यता असून, त्यामुळे ध्वनीप्रदूषणासोबतच उत्सव मंडळांचे कार्यकर्ते आणि पोलीस प्रशासन यांच्यात तणाव निर्माण होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, ध्वनी प्रदूषण (विनियमन आणि नियंत्रण) नियम, २००० अंतर्गत निर्धारित ध्वनीमर्यादेचे पालन करणाऱ्या साऊंड सिस्टिमना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या साऊंड सिस्टिमवर सरसकट बंदी नसून, मोठ्या आवाजाच्या आणि मल्टीलेयर सिस्टीमवर विशेष निर्बंध असणार आहेत.
आगामी उत्सव शांततेत पार पडावेत, कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी आणि ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण राहावे, या उद्देशाने नागपूर पोलिसांनी ही कठोर भूमिका घेतली आहे.

