रुग्णवाढीच्या भागांत प्राधान्याने मनुष्यबळ तैनात करण्याचे निर्देश
पुणे : शहरातील डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन डास नियंत्रणासाठी प्रस्तावित अतिरिक्त २६५ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. या कर्मचाऱ्यांना रुग्णसंख्या अधिक असलेल्या भागांत प्राधान्याने तैनात करावे, असे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी महापालिका प्रशासनाला दिले.
शहरात यावर्षी आतापर्यंत डेंग्यूचे १८२ संशयित रुग्ण आढळले असून त्यापैकी ३९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. चिकुनगुनियाचे १४ संशयित रुग्ण आढळले असून सर्व रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. विशेषतः ऑगस्टमध्ये रुग्णसंख्या वाढल्याने महापालिकेच्या डास नियंत्रण उपाययोजनांचा भिमाले यांनी आढावा घेतला.
डास नियंत्रणासाठी महापालिकेने १५० कायमस्वरूपी पदे भरली आहेत. मात्र, मनुष्यबळ अपुरे असल्याने आणखी २६५ कंत्राटी कर्मचारी घेण्याचा प्रस्ताव आहे. पावसाळा संपत आला तरी हे कर्मचारी प्रत्यक्ष कामावर उपलब्ध झालेले नाहीत. पावसाळ्यापूर्वीच आवश्यक मनुष्यबळ सज्ज ठेवणे अपेक्षित असताना नियुक्तीला विलंब का झाला आणि त्याला जबाबदार कोण, अशी विचारणा भिमाले यांनी केली.
महापालिकेने वर्षभरात डासांची उत्पत्तीस्थळे आढळल्याप्रकरणी एक हजार ७०८ नोटिसा बजावून सुमारे दोन लाख ६५ हजार ६०० रुपयांचा दंड केला आहे. एवढी कारवाई करूनही डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे रुग्ण वाढत असतील, तर डास नियंत्रण मोहीम किती परिणामकारक ठरत आहे, याचाही आढावा घेण्याची गरज असल्याचे भिमाले यांनी स्पष्ट केले.
शहरातील डेंग्यू–चिकुनगुनियाचे हॉटस्पॉट निश्चित करून तेथे डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करणे, सर्वेक्षण आणि आवश्यक फवारणीची विशेष मोहीम राबवावी. या कामाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आढावा घ्यावा, असे निर्देशही भिमाले यांनी दिले.


