खड्डे, रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतूक कोंडीची गंभीर दखल; तातडीने दुरुस्ती व डांबरीकरणाच्या सूचना
पुणे, दि. २७ ऑगस्ट २०२६ : कळस, धानोरी आणि लोहगाव परिसरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, ठिकठिकाणी पडलेले खड्डे तसेच वाढती वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाची गंभीर दखल घेत पुणे महानगरपालिकेच्या महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांनी गुरुवारी परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली.
या पाहणी दौऱ्यात महापौरांनी रस्त्यांची सद्यस्थिती, खड्ड्यांचे प्रमाण, वाहतुकीची वाढती वर्दळ आणि त्यामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांनी माहिती घेतली. रस्त्यांची दुरुस्ती, डांबरीकरण तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
कळस–धानोरी–लोहगाव परिसरातील प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, तसेच आवश्यक ठिकाणी डांबरीकरणाची कामे हाती घेऊन ती नियोजनबद्ध आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावीत, अशा सूचना महापौर मंजुषा नागपुरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. रस्त्यांच्या समस्येमुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
यावेळी महापौर नागपुरे म्हणाल्या, “नागरिकांना सुरक्षित, खड्डेमुक्त आणि सुखकर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे ही पुणे महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. कळस–धानोरी–लोहगाव परिसरातील रस्त्यांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक कार्यवाही केली जाईल. रस्त्यांच्या कामांचा दर्जा आणि वेळेत काम पूर्ण होणे याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.”
या पाहणी दौऱ्यामुळे परिसरातील रस्ते दुरुस्तीच्या कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तसेच नागरिकांसाठी अधिक सुरक्षित आणि सुकर वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून पुढील आवश्यक पावले उचलली जाणार आहेत.
या वेळी नगरसेवक अनिल टिंगरे, नगरसेविका रेखा टिंगरे, नगरसेविका संगीता दांगट, नगरसेविका अश्विनी भंडारे, पुणे महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.


