काँग्रेसचे नवे PPP म्हणजे ‘Paid Political Program’ — नवनाथ बन
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमासाठी पैसे देऊन गर्दी जमवली जात असल्याचा गंभीर आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. समाजमाध्यमांवरील प्रभावशाली व्यक्तींना कार्यक्रमासाठी प्रत्येकी ३० ते ३५ हजार रुपये देण्याची ऑफर दिल्याचा दावा करत त्यांनी यासंदर्भातील व्हिडिओ पुरावे पत्रकार परिषदेत सादर केले.
मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बन यांनी, “राहुल गांधींचा पुण्यातील कार्यक्रम ‘छात्रों की गूंज’ नसून ‘पैसों की गूंज’ आहे. काँग्रेसचे नवे PPP मॉडेल म्हणजे ‘Paid Political Program’ आता समोर आले आहे,” अशी टीका केली.
बन यांच्या आरोपानुसार, पुण्यातील कार्यक्रमाला उपस्थित राहणे, प्रवासाचा खर्च तसेच समाजमाध्यमांवर कार्यक्रमाचा प्रचार करणे यासाठी काही प्रभावशाली व्यक्तींना प्रत्येकी ३० ते ३५ हजार रुपये देण्याची ऑफर देण्यात आली आहे. यासंदर्भातील कथित संभाषणांचे व्हिडिओ त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवले.
या प्रकरणामागे नेमके कोण आहे आणि त्यासाठी वापरला जाणारा पैसा कुठून येत आहे, याची सरकारने सखोल चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
बन म्हणाले की, सुमारे तीन हजार लोकांना प्रत्येकी ३० ते ३५ हजार रुपये देण्यात येत असतील, तर हा खर्च साधारण ९ ते १० कोटी रुपयांपर्यंत जातो. राहुल गांधी यांना राजकीयदृष्ट्या पुन्हा ‘रिलाँच’ करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केला जात आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“हा पैसा कुठून आला? कोण देत आहे? कोणाच्या माध्यमातून दिला जात आहे आणि या पैशांचा अधिकृत हिशोब काय आहे?” असे प्रश्न उपस्थित करत या आर्थिक व्यवहारांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी बन यांनी केली.
या निधीचा परदेशी निधीशी काही संबंध आहे का, काँग्रेसशासित राज्यांमधील कंत्राटे, कमिशन किंवा इतर आर्थिक व्यवहारांतून पैसा वळवण्यात आला आहे का, तसेच कोणत्या संस्था किंवा व्यक्तींमार्फत हा निधी वितरित केला जात आहे, याचाही तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली.
राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा आणि तरुणांचा खरोखरच उत्स्फूर्त पाठिंबा असेल, तर लोकांना पैसे देऊन कार्यक्रमाला बोलावण्याची गरज का भासावी, असा सवालही त्यांनी केला.
आजपर्यंत PPP म्हणजे ‘Public Private Partnership’ अशी संकल्पना माहिती होती; मात्र राहुल गांधी यांच्या कार्यक्रमातून काँग्रेसने ‘Paid Political Program’ असे नवे PPP मॉडेल आणल्याची उपरोधिक टीका बन यांनी केली. विचारांचा प्रभाव आणि जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद नसल्याने पैशांच्या जोरावर गर्दी आणि समाजमाध्यमांवर वातावरण तयार केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
काँग्रेसला भाजपचे पाच सवाल
- पुण्यातील कार्यक्रमासाठी प्रत्येकी ३० ते ३५ हजार रुपये देण्यामागे नेमके कोण आहे?
- सुमारे तीन हजार लोकांसाठी ९ ते १० कोटी रुपये खर्च होत असतील, तर हा पैसा कुठून आला?
- या पैशांचा परदेशी निधीशी काही संबंध आहे का?
- काँग्रेसशासित राज्यांतील कंत्राटी व्यवहार किंवा कमिशनमधून हा पैसा वळवण्यात आला आहे का?
- राहुल गांधी यांच्या राजकीय ‘रिलाँच’साठी एकूण किती कोटी रुपये खर्च केले जात आहेत?
या सर्व प्रश्नांची काँग्रेसने महाराष्ट्रातील जनता आणि देशातील विद्यार्थ्यांसमोर उत्तरे द्यावीत, अशी मागणी नवनाथ बन यांनी केली आहे.
दरम्यान, नवनाथ बन यांनी केलेले हे सर्व आरोप असून त्याबाबत काँग्रेसची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

