पुणे शहर पोलीस, लोहमार्ग पोलीस आणि महापालिकेची संयुक्त कारवाई; ड्रंक अँड ड्राइव्हच्या १० केसेस, २१ हातगाड्या-स्टॉल-फेरीवाल्यांवर अतिक्रमण कारवाई
पुणे, दि. २० ऑगस्ट २०२६ : पुणे रेल्वे स्टेशन आणि परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच अतिक्रमण आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी पुणे शहर पोलीस, पुणे लोहमार्ग पोलीस आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीने संयुक्त कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. बुधवारी रात्री साडेनऊ वाजल्यापासून गुरुवारी पहाटे दोन वाजेपर्यंत ही विशेष मोहीम सुरू होती.
या मोहिमेदरम्यान अलंकार चौकात नाकाबंदी करून ७२ वाहनांची तपासणी करण्यात आली. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांकडून एकूण १४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे कोरेगाव वाहतूक विभागाने जहांगीर चौकात नाकाबंदी करून ७४ वाहनांची तपासणी केली आणि ९ हजार रुपये दंड वसूल केला. त्यामुळे दोन्ही ठिकाणी मिळून एकूण १४६ वाहनांची तपासणी करण्यात आली आणि २३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
ड्रंक अँड ड्राइव्हच्या १० चालकांवर कारवाई
विशेष मोहिमेदरम्यान मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांविरोधातही कठोर कारवाई करण्यात आली. ड्रंक अँड ड्राइव्ह अंतर्गत १० वाहनचालकांवर खटले दाखल करण्यात आले. याशिवाय बंडगार्डन पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ११०/११७ अंतर्गत १० कारवाया आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम ६९ प्रमाणे १५ कारवाया करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
लोहमार्ग पोलिसांचीही धडक कारवाई
पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्याकडूनही रेल्वे स्टेशन परिसरात स्वतंत्र कारवाई करण्यात आली. यामध्ये २५ बेघर व्यक्तींवर कारवाई, बीपी अॅक्ट कलम ११७ अंतर्गत ३० कारवाया, बीएनएसएस कलम १२९ अंतर्गत ९ कारवाया, तर विनातिकीट प्रवासाच्या ३७ कारवाया करण्यात आल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
२१ हातगाड्या, स्टॉल आणि फेरीवाल्यांवर अतिक्रमण कारवाई
पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील रस्ते आणि पादचारी मार्गांवरील अतिक्रमणावरही या संयुक्त मोहिमेत लक्ष केंद्रित करण्यात आले. महापालिकेच्या सहकार्याने एकूण २१ हातगाड्या, स्टॉल आणि फेरीवाल्यांवर अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली.
रेल्वे स्टेशन परिसर हा शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग असल्याने रात्रीच्या वेळी होणारी गर्दी, संशयास्पद हालचाली, बेकायदा व्यवसाय, वाहतूक नियमभंग आणि अतिक्रमण यावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने ही मोहीम राबविण्यात आली.
अनेक यंत्रणांचा संयुक्त सहभाग
ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील,पोलीस उपायुक्त परिमंडळ-५ राजलक्ष्मी शिवणकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग वसंत कुंवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या सूचनेनुसार बंडगार्डन पोलीस स्टेशन, कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन, लष्कर पोलीस स्टेशन, बंडगार्डन वाहतूक विभाग, कोरेगाव पार्क वाहतूक विभाग तसेच पुणे महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी या संयुक्त कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सहभागी झाले होते.

