मार्च २०२७ पर्यंत २०० ते ३०० समर्पित गोल्ड लोन शाखा; सिक्युअर्ड लेंडिंग पोर्टफोलिओ विस्तारावर भर
मुंबई, दि. २० ऑगस्ट २०२६ : आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडने आपल्या एनबीएफसी व्यवसायाच्या माध्यमातून गोल्ड लोन अर्थात सुवर्ण कर्ज व्यवसायात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. सिक्युअर्ड लेंडिंग पोर्टफोलिओचा विस्तार करण्याच्या धोरणाचा हा महत्त्वाचा भाग असून, कंपनीने पुढील तीन वर्षांत देशभरात सुमारे १,००० समर्पित गोल्ड लोन शाखांचे जाळे उभारण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.
कंपनीने सुरुवातीच्या टप्प्यात मार्च २०२७ पर्यंत २०० ते ३०० समर्पित गोल्ड लोन शाखा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. या शाखा विशेषतः गोल्ड लोनची क्षमता अधिक असलेल्या बाजारपेठांमध्ये टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत.
आदित्य बिर्ला कॅपिटलची गोल्ड लोन सेवा कंपनीच्या सध्याच्या रिटेल आणि एमएसएमई कर्ज व्यवसायाला पूरक ठरणार आहे. ग्राहकांना सोने तारण ठेवून पारदर्शक आणि तुलनेने जलद कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, या सेवेमध्ये प्रत्यक्ष शाखांबरोबरच डिजिटल सुविधांचाही वापर करण्यात येणार आहे. कर्जाचे पारदर्शक दर, तारण ठेवलेल्या सोन्याची सुरक्षित हाताळणी आणि जलद कर्ज वितरण या बाबींवर विशेष भर दिला जाणार आहे.
भारतात गोल्ड लोन क्षेत्रात मोठी संधी
आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि सीईओ–एनबीएफसी राकेश सिंग यांनी गोल्ड लोन व्यवसायात भारतात मोठी संरचनात्मक वाढ दिसून येत असल्याचे सांगितले.
विश्वास आणि सोन्याच्या सुरक्षिततेला या व्यवसायात विशेष महत्त्व असल्याने आदित्य बिर्ला समूहाची विश्वासार्हता, गव्हर्नन्स, जोखीम व्यवस्थापन आणि ग्राहककेंद्री दृष्टिकोन यांचा फायदा नवीन व्यवसायाला होईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.
कंपनी हा व्यवसाय सुरुवातीपासून स्वतंत्रपणे उभारत असून, देशभरातील विद्यमान वितरण नेटवर्क आणि डिजिटल क्षमतांचा वापर करून ग्राहकांपर्यंत पोहोच वाढविण्याची योजना आहे.
शहरी तसेच निमशहरी बाजारपेठांवर लक्ष
गोल्ड लोन सेवा शहरी तसेच निमशहरी बाजारपेठांतील ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आदित्य बिर्ला कॅपिटलच्या विद्यमान ग्राहकांना ही सेवा देण्याबरोबरच नवीन ग्राहकांनाही शाखा आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जोडण्याचा कंपनीचा प्रयत्न असेल.
एनबीएफसी व्यवसायाची वेगवान वाढ
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२६ मध्ये आदित्य बिर्ला कॅपिटलच्या एनबीएफसी व्यवसायाचे AUM २७ टक्क्यांनी वाढून १ लाख ५९ हजार ९१६ कोटी रुपयांवर पोहोचले. त्यामध्ये रिटेल आणि एसएमई व्यवसायाचा वाटा जवळपास ६८ टक्के होता.
त्याच काळात कर्ज वितरण २५ टक्क्यांनी वाढून ८४ हजार २०४ कोटी रुपये, तर करपूर्व नफा २० टक्क्यांनी वाढून ४ हजार २३ कोटी रुपये झाला.
आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीतही वाढ कायम राहिली. AUM २८ टक्क्यांनी वाढून १ लाख ६७ हजार ४५६ कोटी रुपये, कर्ज वितरण ३४ टक्क्यांनी वाढून २१ हजार २०१ कोटी रुपये, तर करपूर्व नफा ३२ टक्क्यांनी वाढून १ हजार २२२ कोटी रुपये झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.
गोल्ड लोनसारख्या वेगाने वाढणाऱ्या रिटेल क्रेडिट क्षेत्रात प्रवेश करून आदित्य बिर्ला कॅपिटलने आता आपल्या सिक्युअर्ड लेंडिंग व्यवसायाच्या विस्तारासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

