एसजी-१०५ विमानाचे उड्डाण अखेर रद्द; सुमारे १५० प्रवासी रात्रभर अडकले, दुसरे विमान पहाटे पुण्याकडे रवाना
पुणे : दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात मंगळवारी रात्री तांत्रिक बिघाड झाल्याने वातानुकूलित यंत्रणा बंद पडली आणि एपीयू (Auxiliary Power Unit)मधून गरम हवा थेट केबिनमध्ये येऊ लागल्याचा प्रकार घडला. त्यामुळे विमानातील तापमान झपाट्याने वाढून लहान मुले, गर्भवती आणि इतर प्रवाशांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याचे प्रवाशांनी सांगितले.
स्पाइसजेटचे एसजी-१०५ हे विमान मंगळवारी रात्री ९.५५ वाजता दिल्लीहून पुण्याकडे उड्डाण करणार होते. उशिरामुळे विमान रात्री साडेदहाच्या सुमारास उड्डाणासाठी तयार झाले. विमानात सुमारे १५० प्रवासी होते.
विमान टॅक्सी-वेवर आल्यानंतर एसी काम करत नसल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. काही वेळातच थंड हवेऐवजी गरम हवा केबिनमध्ये येऊ लागली. विमानातील एसी पॅक्स अर्थात कूलिंग यंत्रणा निकामी झाल्यामुळे इंजिन किंवा एपीयूमधून येणारी गरम हवा पुरेशी थंड न होताच केबिनमध्ये येत असल्याची माहिती देण्यात आली.
खिडक्या आणि दरवाजे बंद असल्याने काही मिनिटांतच केबिनमधील तापमान मोठ्या प्रमाणात वाढले. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर प्रवाशांनी उभे राहून उड्डाण रद्द करण्याची मागणी केली. अखेर मुख्य वैमानिकाने विमान पुन्हा धावपट्टीकडे आणले आणि तांत्रिक पथकाच्या तपासणीनंतर विमानात बिघाड असल्याचे स्पष्ट झाल्यावर उड्डाण रद्द करण्यात आले.
टॅक्सी-वेवर प्रवाशांचा निषेध
तांत्रिक विभागाने विमान उड्डाणासाठी योग्य नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर प्रवाशांना विमानातून उतरविण्यात आले. यावेळी विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही, असा आरोप काही प्रवाशांनी केला.
या निषेधार्थ काही प्रवाशांनी टॅक्सी-वेवरच आंदोलन केले. प्रवाशांना तत्काळ वैद्यकीय मदत किंवा पिण्याचे पाणी उपलब्ध झाले नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
प्रवासी लेशपाल जवळगे यांनी या घटनेबाबत नागरी विमान वाहतूक संचालनालयाकडे लेखी तक्रार करणार असल्याचे सांगितले. “प्रवाशांच्या सुरक्षिततेशी संबंधित हा गंभीर प्रकार असून, दोषींवर कारवाई झाली पाहिजे,” अशी त्यांची मागणी आहे.
पहाटे पाच वाजता दुसरे विमान
दिल्ली विमानतळावर मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास दाखल झालेले अनेक प्रवासी या प्रकारामुळे रात्रभर अडकून पडले. रात्रीचे उड्डाण रद्द झाल्यानंतर अखेर बुधवारी पहाटे पाच वाजता दुसऱ्या विमानाने पुण्यासाठी उड्डाण केले.
हे विमान सकाळी सातच्या सुमारास पुण्यात दाखल झाले. त्यामुळे नियोजित वेळेच्या तुलनेत प्रवाशांना अनेक तासांचा विलंब सहन करावा लागला.

